आजपासून ऐकू येणार नाही अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून


नवी दिल्ली – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात जनजागृती करण्यासाठी फोन कॉलआधी ऐकू येणारी कॉलर ट्यून आजपासून बदलणार आहे. अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कोरोनाबाबत जनजागृती करणारी कॉलर ट्यून आता ऐकू येणार नाही. पण आता त्याची जागा नवीन कॉलर ट्यून घेणार आहे. उद्यापासून देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात होत असल्याने बच्चन यांच्या आवाजातील जुनी कॉलर ट्यून आता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून मोबाइलची डिफॉल्ट कॉलर ट्यून बदलणार आहे.

उद्यापासून देशात कोरोना लसीकरणाला सुरू होणार असून लसीकरणाबाबत जनजागृती करणारी नवीन कॉलर ट्यून असेल. महिलेच्या आवाजात नवीन कॉलर ट्यून असेल आणि ‘नवे वर्ष लसीच्या रुपात नवी आशा घेऊन आले आहे’ अशाप्रकारचा संदेश या ट्यूनमधून दिला जाईल. त्याचबरोबर भारतीय लसीवर विश्वास ठेवा आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असा संदेशही जनतेला नवीन कॉलर ट्यूनद्वारे दिला जाईल.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. अमिताभ बच्चन यांच्याऐवजी एखाद्या करोना योद्ध्याचा आवाज असणे आवश्यक असल्याचे या याचिकेत म्हटले होते. त्यामुळे बिग बी यांच्या आवाजातील कॉलर ट्यून काढावी, असे याचिकेत नमूद केले होते.