चौथी कसोटी; पहिल्या दिवसअखेर ऑस्ट्रेलिया ५ बाद २७४


गाबा – ऑस्ट्रेलियाने भारताविरूद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीत पहिल्या दिवसअखेर ५ गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या असून मार्नस लाबूशेनचे शानदार शतक आणि मॅथ्यू वेडच्या ४५ धावांच्या खेळीच्या जोरावर यजमान संघाला पहिल्या दिवशी अडीचशेपार मजल मारता आली. भारताकडून कसोटी पदार्पण करणाऱ्या गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. टी नटराजनने २ बळी टिपले. तर वॉशिंग्टन सुंदरला स्टीव्ह स्मिथच्या रूपात आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी बळी मिळाला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याने घेतला. तो निर्णय त्यांच्या सलामीवीरांनी चुकीचा ठरवल. डेव्हिड वॉर्नर एका धावेवर तर मार्कस हॅरिस ५ धावांवर माघारी परतल्यानंतर मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ या अनुभवी जोडी यजमानांचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्मिथ ३६ धावांवर बाद झाला. पण लाबूशेनने मॅथ्यू वेडच्या साथीने डाव दोनशेपार पोहोचवला.

मॅथ्यू वेड आणि लाबूशेन यांच्यात शतकी भागीदारी झाली, पण वेडला अर्धशतक करता आले नाही. तो ४५ धावांवर माघारी परतला. त्याने सहा चौकार ठोकले. त्यानंतर मार्नस लाबूशेनने आपले दमदार शतक पूर्ण केले. त्याला आधीच्या सामन्यांमध्ये शतक करता आले नव्हते, पण त्याने या सामन्यात शतक झळकावले. शतक पूर्ण झाल्यावर फटकेबाजी करताना, तो १०८ धावांवर झेलबाद झाला. लाबूशेनने २०४ चेंडू खेळत ९ चौकार खेचले. त्यानंतर कर्णधार टीम पेन आणि कॅमेरॉन ग्रीन या जोडीने दिवसाचा खेळ संपेपर्यंत चांगला खेळ केला. ग्रीन २८ तर पेन ३८ धावांवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून नटराजनने दोन तर सिराज, सैनी आणि सुंदरने १-१ बळी टिपला.

दरम्यान स्वत:चे ८वे षटक टाकत असताना नवदीप सैनीच्या मांडीच्या स्नायूंवर ताण आल्यामुळे त्याने गोलंदाजी थांबवली. प्रथमोपचार घेऊन तो मैदानात काही काळ क्षेत्ररक्षण करत होता. पण वेदना असह्य झाल्याने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. तेथून त्याला हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. त्याला दुखापतीनंतर स्कॅनसाठी नेण्यात आल्यामुळे भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.