नीलम गोऱ्हे, सुप्रिया सुळे, यशोमती ठाकूर यांना शोधून देणाऱ्यास पाचशे रुपयांचे इनाम : तृप्ती देसाई


मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन राज्यातील राजकारण आता चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. त्यानंतर गेले दोन ते तीन दिवस विविध राजकीय घडामोडींनी गाजले. मुंडे यांच्या राजीनाम्याची विरोधी पक्षाकडून होत असलेली मागणी जोर धरत असताना आता मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सामाजिक क्षेत्रातूनही होत आहे. या दरम्यान महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला आहे.

नीलमताई गोऱ्हे, सुप्रियाताई सुळे, यशोमतीताई ठाकूर हरवल्या आहेत. कृपया कुणाला दिसल्यास सांगावे. ही माहिती देणाऱ्यास पाचशे रुपयांचे रोख बक्षीस दिले जाईल, असे म्हणत तृप्ती देसाई यांनी महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांवर टीका केली आहे. या तिघीही हाथरस बलात्कार प्रकरणात खूपच आक्रमकपणे पीडित मुलीला न्याय मिळवा म्हणून पुढे सरसावल्या होत्या. पण आता दुर्दैव असे आहे की, जर एखादी महिला आपल्या राज्यात या प्रकरणी आत्ता मंत्रीमंडळात असलेल्या एखाद्या मंत्र्याविरोधात आवाज उठवत आहे. आपल्यावर अत्याचार झाला आहे, असे जर ती सांगत आहे, पोलीसात तक्रार करत आहे, त्याचे पुरावेही देत आहे. तरी गुन्हा दाखल करण्यास पोलीस टाळाटाळ करत आहेत.

तुम्ही तिघी कार्यरत असलेल्या पक्षाच्या, युतीच्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळात धनंजय मुंडे मंत्री आहेत. म्हणून ‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कारटे’ अशी भूमिका या प्रकरणात तुम्ही घेत आहात, असे सर्वसामान्य जनतेला वाटत आहे. महिलांचे सबलीकरण यासाठी आवाज उठवत असताना आपल्या पक्षातील एखाद्या नेत्यावर आरोप झाले, तर त्याविषयी बोलायचे नाही अशी भूमिका तुमच्यासारख्या महिला नेत्या जर घ्यायला लागल्या तर महाराष्ट्रात महिला सबलीकरण होणे अशक्य आहे. आपण महाराष्ट्रात असाल तर नक्कीच या प्रकरणावर जाहीरपणे बोला, सध्या तुमची गरज रेणू शर्माला असल्याचे तृप्ती देसाई म्हणाल्या.

धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणीही सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केली आहे. ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी दिल्यामुळे एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली, असा संदेश जनतेमध्ये जात असून तो पुढील दृष्टीने चुकीचा असल्याचे तृप्ती देसाई म्हणाल्या.

रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून, तात्काळ गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच जर कोणी रेणू शर्मांविरोधात तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने तातडीने कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असे तृप्ती देसाई म्हणाल्या.