सूरतमधील हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीसाठी दिली ११ कोटीची देणगी


नवी दिल्ली – गुजरातच्या सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीसाठी ११ कोटी रुपयाची देणगी दिली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यालयात गोविंदभाई ढोलकीया या हिरे व्यापाऱ्याने ही देणगी दिली. विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी अयोध्येतील राम मंदिरासाठी आजपासून देणगी गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

रामकृष्ण डायमंड कंपनीचे गोविंदभाई ढोलकीया हे मालक आहेत. गोविंदभाई मागच्या अनेक वर्षांपासून आरएसएसशी संबंधित आहेत. १९९२ सालापासून गोविंदभाई राम मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करत आहेत. ११ कोटी रुपयांची देणगी त्यांनी दिली आहे. गोविंदभाई राम मंदिरासाठी इतकी प्रचंड देणगी देणारे एकटे नाहीत. सूरतमधील महेश कबूतरवाला यांनी राम मंदिरासाठी पाच कोटीची देणगी दिली आहे.

लवजी बादशाह यांनी एक कोटी रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी गुजरातमधून अनेक व्यापाऱ्यांनी पाच ते २१ लाख रुपयांची देणगी दिली आहे. भारतीय जनता पार्टीचे गोरधन झाडाफीया आणि सुरेंद्र पटेल यांनी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे. राम मंदिरासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम देणगी दिल्याचे विहिपचे आलोक कुमार यांनी सांगितले. ते देशाचे पहिले नागरिक आहेत. म्हणून मोहिम सुरु करण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेल्याचे आलोक कुमार यांनी सांगितले.