१३ हजार किमी प्रवास करून आलेल्या कबुतराला ऑस्ट्रेलियात मृत्युदंड

फोटो साभार नवभारत टाईम्स

अमेरिकेपासून १३ हजार किमीचा प्रवास करून ऑस्ट्रेलियात पोहोचलेल्या रेसिंग कबुतराला ठार करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने केली आहे. या कबुतरामुळे देशात बर्ड फ्ल्यूचा फैलाव होण्याची भीती असल्याने त्याला ठार केले जाणार असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार २९ ऑक्टोबर रोजी अमेरिकेच्या ओरेगॉन रेसमधून हे कबुतर गायब झाले होते ते प्रशांत महासागर पार करून २६ डिसेंबर रोजी मेलबर्न येथे राहणाऱ्या केविन सेली यांच्या घराच्या मागे दिसले. कबुतरासंबंधी माहिती कळताच मीडियावर या कबुतराच्या साहसी प्रवासाच्या कथा झळकू लागल्या होत्या.

मात्र ऑस्ट्रेलियाच्या क्वारंटाइन अँड इन्स्पेक्शन सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्यांनी या कबुतरापासून देशाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे सांगून सेली याना कबुतर पकडण्याचे आदेश दिले. विशेषज्ञ आणि तज्ञांच्या म्हणण्यानुसार हे कबुतर मालवाहू जहाजाच्या सहाय्याने प्रशांत महासागर पार करून ऑस्ट्रेलियात पोहोचले असावे.

दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या कृषी विभागाने या कबुतराला देशात राहता येणार नाही अशी नोटिस बजावली आहे. या कबुतरामुळे देशाची खाद्य सुरक्षा आणि पोल्ट्री सुरक्षा धोक्यात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यामुळे या कबुतराला ठार करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे समजते. एका रिपोर्ट नुसार हे कबुतर खरोखरच १३ हजार किमीचा प्रवास उडत करत आले असेल तर ते रेकॉर्ड आहे.