रामसेतूचे रहस्य उलगडणार एनआयओ

भारतीयांसाठी रामसेतूचे अध्यात्मिक महत्व खुपच आहे. सत्ययुगात रामाला सीतेच्या मुक्तीसाठी लंकेपर्यंत जाता यावे यासाठी वानरसेनेने समुद्रात पूल बांधला असा समज आहे. वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा या पुलाचे महत्व मोठे असून इंजिनीअरिंगचा अतिउत्कृष्ट नमुना म्हणून त्याकडे पाहिले जाते. या सर्व विशेष बाबी लक्षात घेतल्या तरी आजही हा सेतू नक्की कधी बांधला गेला त्याचा अचूक अंदाज कुणालाच वर्तविला आलेला नाही.

हे रहस्य उलगडण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्रॉफीचे शास्त्रज्ञ अंडरवॉटर संशोधन करणार आहेत. या संशोधनासाठी देशाच्या पुरातत्व विभागाच्या सेंट्रल अॅडव्हायझरी बोर्डाची मंजुरी घेतली गेल्याचे समजते.

रामसेतू जगभर अॅडम ब्रीज नावानेही ओळखला जातो. या सेतूला कोणतेही नुकसान होऊ नये, समुद्री जीवनाला कोणताही अपाय होऊ नये आणि समुद्राच्या पर्यावरणात कोणताही हस्तक्षेप न करता हे संशोधन केले जाणार आहे. हा सेतू ५० किमी लांबीचा असून तामिळनाडूच्या रामेश्वरम बेटापासून लंकेतील मन्नार बेटापर्यंत आहे.

पौराणिक कथेनुसार रामसेतूची निर्मिती वानर सेनेने बजरंगबलीच्या सुचनेनुसार केली आणि या सेतूवरून लंकेत जाऊन भगवान रामाने रावणाला ठार करून सीतेची सुटका केली. मन्नार खाडी व पाल्क खाडी मध्ये लाटा विरुद्ध दिशांनी येऊन एकमेकांवर आदळतात. रामेश्वरम आणि मन्नार येथे समुद्राचे पाणी उथळ आहे. हे दोन्ही भाग जोडलेले असून त्यावर मन्नार रामेश्वरम सह अनेक बेटे आहेत आणि ही बेटे पुलासारखी दिसतात असेही सांगितले जाते.