अंबानीना मागे सारून टाटा घराणे आघाडीवर

फोटो साभार इंडिया टीव्ही

कंपनी मूल्याच्या दृष्टीने कोण पुढे याची स्पर्धा रिलायंस उद्योग घराणे आणि टाटा उद्योग घराणे यामध्ये नेहमीच सुरु असते. गत वर्षी जुलै २०२० मध्ये अंबानी यांच्या रिलायंस ग्रुपने टाटांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर झेप घेतली होती. मात्र गेल्या सहा महिन्यात पुन्हा एकदा टाटा ग्रुपने अव्वल स्थानावर हक्क प्रस्थापित केला आहे. देशभरातील नागरिकात विश्वसनियता, उत्पादनाबाबत खात्री यामुळे मिठापासून सॉफ्टवेअर पर्यंत अनेक उद्योगात असलेला टाटा ग्रुप टीसीएसच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर पुन्हा मार्केट कॅप मध्ये प्रथम स्थानावर आला आहे.

मार्केट कॅपच्या यादीत अंबानी सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत. दोन नंबरवर एचडीएफसी ग्रुप आहे. टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांची मार्केट कॅप १७ लाख कोटी, एचडीएफसीची मार्केट कॅप दोन लाख कोटींनी वाढून १५.२५ लाख कोटी वर गेली आहे. गेल्या वर्षात टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यांनी चांगली कामगिरी बजावली असून त्यामुळे मार्केट कॅप मध्ये ४२ टक्के वाढ झाली आहे. जुलै २०२० मध्ये टाटाच्या सर्व १७ कंपन्यांची मार्केट कॅप ११.३२ लाख कोटी होती तर याच काळात रिलायंस ग्रुपची मार्केट कॅप १३ लाख कोटी होती. टाटा ग्रुपला प्रथम स्थानांवर आणण्यात टीसीएस, टाटा मोटर्स, टाटा स्टील यांनी मोठे योगदान दिले असल्याचे समजते.