बीटकॉइन डिजिटल वॉलेटचा पासवर्ड विसरल्याने नशिबावर लागलेय कुलूप

रातोरात गुतंवणूकदारांना कोट्याधीश बनविणारे बीटकॉइन अनेक गुंतवणूकदारांच्या नशिबावर कुलूप ठोकणारे ठरले असून हे गुंतवणूकदार भिकारी होऊन रस्त्यावर येण्याची पाळी आल्याचे समजते.  क्रिप्टोकरन्सी डिजिटल वॉलेटचा पासवर्ड विसरल्याने त्यांच्यावर ही वेळ आली आहे.

क्रिप्टोकरन्सी डेटा फर्म चाइनालीसीसच्या रिपोर्ट नुसार जगात यावेळी १.८५ कोटी बीटकॉइन असून त्यातील २० टक्के डिजिटल वॉलट मध्ये स्टोर केली आहेत. सॅन फ्रान्सिस्कोचा कॉम्प्युटर प्रोग्रामर स्टीफन थॉम्स यांच्याकडे २२ कोटी डॉलर्सची बीटकॉइन्स आहेत मात्र तो हार्ड ड्राईव्हचा पासवर्ड विसरला आहे. यात त्याच्या डिजिटल वॉलेटच्या खासगी किल्ल्या आहेत. हे अनलॉक करण्यासाठी १० संधी असतात पैकी स्टीफन याने ८ वेळा प्रयत्न केला आहे. उरलेल्या दोन वेळा त्याला अपयश आले तर त्याची गुंतवणूक शून्यावर जाणार आहे.

लॉस एंजेलिस येथील उद्योगपती ब्रॅड यासर यानेही डिजिटल वॉलेटचा हरविलेला पासवर्ड शोधण्यासाठी  अनेक वर्षे अनेक तास खर्च केले आहेत. त्याची हजारो बीटकॉइन आज कोट्यवधीच्या किमतीची आहेत पण पासवर्ड मिळेपर्यंत त्याच्यासाठी ती कवडीसमान ठरली आहेत. बीटकॉइनचे सॉफ्टवेअर अतिशय किचकट एल्गोरिदमवर आधारलेले आहे. बीटकॉइन मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदराचा एक पत्ता व एक खासगी किल्ली तयार होते. ती फक्त वॉलेट बनविणाऱ्याला माहिती असते. या सिस्टीमच्या माध्यमातून कुणीही वित्त्तीय संस्था नोंदणी न करता किंवा स्वतःची ओळख न देता बीटकॉइनचा मालक बनू शकतो.