अंतराळात वर्षभर राहून १२ वाईन बाटल्या पृथ्वीवर परतल्या

 

फोटो साभार पत्रिका

अंतराळ स्थानकात वेळोवेळी पृथ्वीवरून अंतराळवीर काही दिवसांच्या मुक्कामासाठी जातात आणि नंतर पृथ्वीवर परत येतात या बातम्या आता आपल्या अंगवळणी पडल्या आहेत. मात्र अंतराळात वर्षभर राहून पृथ्वीवर परतलेल्या १२ वाईनच्या बाटल्या ही मात्र नक्कीच नवी बातमी आहे.

नोव्हेंबर २०१९ मध्ये फ्रांस मधून उत्तम गुणवत्तेच्या बोर्दो रेड वाईनच्या १२ बाटल्या अंतराळ स्टेशनवर पाठविल्या गेल्या होत्या. शून्य गुरुत्वाकर्षणाचे रहस्य उलगडणे हा त्यामागे हेतू होता. हा प्रयोग लग्झेंबर्गच्या स्टार्टअप स्पेस कार्गो अनलिमिटेड तर्फे केला गेला. या बाटल्या व्यवस्थित बंद करून स्टीलच्या सिलेंडरमध्ये सुरक्षित राहाव्या म्हणून भरल्या गेल्या होत्या.

शून्य गुरुत्वाकर्षणात राहिल्याचा या बाटल्यातील वाईनवर काय परिणाम होतो, त्यांची चव बदलते का याचे परीक्षण यातून केले जाणार आहे. या बाटल्या फेब्रुवारीच्या शेवटी उघडल्या जाणार आहेत. त्यासाठी टेस्टिंग इव्हेंट फ्रांसमध्ये आयोजित केला जात आहे. यात वाईन तज्ञ सामील होणार आहेत. या प्रयोगात फ्रांसच्या बार्दो आणि जर्मनीच्या बेवेरीया विद्यापीठांनी सहकार्य केले असल्याचे समजते. या वाईनच्या चवीबरोबर तिची रासायनिक तपासणी सुद्धा केली जाणार आहे.

या टेस्टिंगचा मुख्य उद्देश कृषी संदर्भात सुविधा निर्माण करणे हा आहे. जागतिक तापमान वाढ आणि जलवायू परिवर्तन यामुळे पृथ्वीवर शेती आव्हानात्मक बनली आहे. त्यामुळे अंतराळात नवे प्रयोग करून कृषी उद्योगाला नवी दिशा देण्यासाठी असे प्रयोग केले जात आहेत.