धनंजय मुंडे प्रकरणी संजय राऊत यांचे भाष्य


मुंबई – बलात्काराच्या आरोपानंतर विरोधक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना संपूर्ण प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. योग्य निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार घेतील असे सांगत कौटुंबिक विषयात राजकारण करणे योग्य नसल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आपण हे धनंजय मुंडे यांच्यावरच सोडलं पाहिजे. हा पूर्णपणे त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे. त्यातून ते मार्ग काढतील. शेवटी सुजाण आणि प्रगल्भ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्व आहे. काय निर्णय घ्यावेत आणि काही नाही याचा सर्वात जास्त अनुभव कोणाला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जर त्यांना महाविकास आघाडीचे सरकार अडचणीत येईल, असे वाटत असेल तर तो भ्रम असल्याचा टोला संजय राऊत यांनी यावेळी विरोधकांना लगावला.

आरोप-प्रत्यारोप राजकीय विषयात करण्यास हरकत नाही. पण कोणीही कौटुंबिक विषयात राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. राजकीय लोकांनी हे आपापसात करु नये, हे बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितले असल्याचे संजय राऊत यांनी यावेळी म्हटले.