रिलायन्स जिओचा 4G डाउनलोड स्पीडमध्ये दबदबा कायम


नवी दिल्ली – 4G डाउनलोड स्पीडमध्ये आपला दबदबा आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने कायम ठेवला आहे. तर, व्होडाफोन-आयडिया अपलोड स्पीडमध्ये अव्वल ठरली आहे. डिसेंबर महिन्यातील आकडेवारी आपल्या MySpeed पोर्टलवर टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (ट्राय) जारी केली आहे.

ट्रायने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर महिन्यातील जिओचा सरासरी डाउनलोड स्पीड 20.2 Mbps नोंदवण्यात आला. जिओचा डाउनलोड स्पीड नोव्हेंबरमध्ये 20.2 Mbps होता. पण याच दरम्यान एअरटेलला मात्र झटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्यापेक्षाही कमी त्यांचा डाउनलोड स्पीड नोंदवण्यात आला असून एअरटेल क्रमवारीमध्ये व्होडाफोन आणि आयडियाच्याही खाली गेली आहे.

व्होडाफोन आणि आयडिया सेल्यूलर या दोन्ही कंपन्या व्होडाफोन-आयडिया म्हणून एकत्र आल्या असल्या तरी ट्राय मात्र दोन्ही कंपन्यांचे आकडे वेगवेगळे दाखवते. त्यानुसार डाउनलोड स्पीडमध्ये जिओनंतर दुसऱ्या क्रमांकावर 9.8 Mbps डाउनलोड स्पीडसह व्होडाफोन आहे. तर 8.9 Mbps डाउनलोड स्पीडसह तिसऱ्या क्रमांकावर आयडिया आहे. त्याचबरोबर एअरटेलचा डाउनलोड गेल्या डिसेंबरमध्ये स्पीड केवळ 7.8 Mbps एवढा नोंदवण्यात आला. एअरटेलचा डाउनलोड स्पीड नोव्हेंबरमध्ये 8.0 Mbps होता. म्हणजेच नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये एअरटेलचा डाउनलोड स्पीड कमी झाला आहे.