आता फेब्रुवारीपासून बुकिंग केल्यानंतर फक्त 30 मिनिटात गॅस सिलेंडर तुमच्या दारात!


नवी दिल्ली – सर्व साधारणपणे आपण गॅस सिलेंडर बुक केल्यानंतर त्याची आपल्याला दोन ते तीन दिवसांनंतर डिलिव्हरी होते. कधी कधी तर बुकिंग केल्यानंतर आठवडाभर सिलेंडर येत नाही. त्यातच ज्यांच्याकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांचे तर जास्तच हाल होतात. यामुळे आपली चीडचीड होते आणि मनस्तापही सहन करावा लागतो, पण ही वेळ आता ग्राहकांवर येणार नाही. कारण बुकिंग केल्यानंतर त्याच दिवशी अवघ्या 30 मिनिटांच्या आत गॅस सिलेंडर तुमच्या दारात पोहोचणार आहे.

ग्राहकांना सिलेंडर वेळेत न मिळणे या समस्येवर एक प्रभावी प्लान इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कंपनीने तयार केला आहे. सध्या राज्यातील फक्त एकाच शहरात या प्रक्रियेला सुरुवात होणार असून नंतर या योजनेचा विस्तार होणार आहे. या योजनेवर काम सुरू असून फेब्रुवारीच्या एक तारखेपासूनच या योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल, असा दावा इंडियन ऑईलने केला आहे.

जगभरात आयओसीचे 28 कोटी ग्राहक आहेत. यामध्ये 14 कोटी ग्राहक इंडियन ऑइल कंपनीचे सिलेंडर वापरतात. सिलेंडर संपल्यानंतर ग्राहकांनी बुक केल्यानंतर, तो मिळेपर्यंत अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनेकवेळा पाठपुरावा करावा लागतो. बरेच दिवस वाट पाहावी लागते, या सर्व समस्यांवर उपाय म्हणून आयओसीने या योजनेची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे.