गंगासागर मेळा- हजारो भाविकांना मिळाला ई स्नानाचा लाभ

दरवर्षी प.बंगाल मधील गंगासागर या ठिकाणी मकरसंक्रांती निमित्त भरणाऱ्या मेळ्यात यंदा करोनामुळे गर्दीवर नियंत्रण आले असले तरी देशभरातील किमान ५४ हजार भाविकांनी गंगेच्या पवित्र जलस्नानाचा लाभ लुटला आहे. या वर्षी प.बंगाल सरकारने मोठे पाउल उचलताना भाविकांना संक्राती पर्वात ई स्नान सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली होती. त्यानुसार नोंदणी केलेल्या ५४ हजार भाविकांना बंगाल खाडीतील गंगासंगम येथील पवित्र जल घरबसल्या मिळाले.

राज्य पंचायत मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविड मुळे गंगासागर मेळ्यात गर्दी टाळण्यासाठी सरकारने ई स्नान योजनेला प्रोत्साहन देण्याची योजना आखली होती. त्यानुसार देशभरात कुठेही १५० रुपयात पवित्र गंगाजल आणि प्रसाद पाठविला जात आहे. आत्तापर्यंत ५४ हजार भाविकांनी याचा लाभ घेतला. दरवर्षी लाखो भाविक मकरसंक्रांती स्नानासाठी गंगासागर येथे जमतात.

कोलकाता पासून १३० किमीवर असलेल्या सागरद्वीप येथे हा मेळा भरतो. कुंभ मेळ्यानंतर हा दुसऱ्या नंबरचा मोठा मेळा मानला जातो. येथे भाविक गंगास्नान करून कपिल मुनींची प्रार्थना करतात. यंदा १४ जानेवारीला सकाळी ६ वा.२ मिनिटापासून या शुभमुहूर्ताची सुरवात झाली आणि पुढील २४ तासात हे पवित्र स्नान करता येणार आहे. १२ जानेवारीला २ लाख भाविक गंगासागर येथे जमले आहेत त्यातील ५ कोविड बाधित असल्याचे समोर आले आहे. कोविड संदर्भातील सर्व नियम पाळून हा उत्सव साजरा केला जात आहे.