करोना काळात किती वेळ स्मार्टफोनवर गेला याची येथे घ्या माहिती

गेल्या वर्षात करोना प्रकोपामुळे लॉकडाऊन आणि गर्दीवरील नियंत्रण नियम यामुळे जवळजवळ वर्षभर लोकांना घरात वेळ घालवावा लागला आणि या काळात लोकांनी वेळ घालविण्यासाठी मोबाईलचा आधार घेतला. या संदर्भात एक अहवाल नुकताच आला आहे. त्यानुसार २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये मोबाईल युजर्सनी ३७ टक्के जादा वेळ स्मार्टफोन वापरला. रोज सरासरी ४.६ तास वेळ लोकांनी स्मार्टफोनवर घालविला असून गेल्या वर्षी हे प्रमाण ३.३ तास इतके होते.

या काळात अॅप डाऊनलोड करण्याच्या प्रमाणात ३० टक्के वाढ झाली आणि अॅप स्टोरवर ग्राहकांनी २४.२७ अब्ज खर्च केले. अर्थात या खरेदीत भारताचे स्थान जगात २५ वे असले तरी भारतात या खरेदीत गतवर्षाच्या तुलनेत ३५ टक्के वाढ नोंदविली गेली. डाऊनलोडसाठी युजर्सनी ५० कोटी डॉलर्स खर्च केले असून त्यात चीन आघाडीवर तर भारत दोन नंबरवर आहे.

अॅपअॅनी फर्मने हा अहवाल सादर केला असून २०२० मध्ये गेम्स सर्वाधिक डाऊनलोड केले गेले. प्रत्येक पाच डाऊनलोड मध्ये दोन गेम्स आहेत. भारतात मंथली अॅक्टीव्ह युजर्स रँकिंग मध्ये फेसबुक अॅप्स व्हॉटस अप आणि फेसबुक टॉपवर असून २०१९ च्या तुलनेत हे प्रमाण अनुक्रमे २५ व १५ टक्के जास्त आहे. इन्स्टाग्राम मध्ये १० टक्के वाढ दिसली आहे. गेम्स बाबत भारतात लुडो किंग आणि पबजी आघाडीवर राहिले तर अर्थविषयक अॅप्सना सुद्धा पसंती मिळाली.

टॉप ५ गुंतवणूक अॅप आणि ट्रेडिंग अॅप २०२० मध्ये ७५ टक्के जास्त वेळ पहिली गेली. युजर्सनी १७७ अब्ज तास व्हिडीओ स्ट्रीमिंगचा आनंद लुटला. हे प्रमाण सुद्धा २०१९ च्या तुलनेत ४० टक्के जास्त आहे. यात युट्यूब, एमएक्स प्लेअर टॉपवर राहिले आणि अनुक्रमे २५ व २० टक्के वाढ नोंदविली गेली. फूड ड्रिंक विभागात ३५ टक्के घट दिसली तर शैक्षणिक अॅप्स १७० टक्के वाढ व बिझिनेस व हेल्थ फिटनेस अॅप मध्ये अनुक्रमे १२० व ८० टक्के वाढ दिसून आली असे या अहवालात नमूद केले गेले आहे.