दोनच दिवसांपूर्वीच सुरु झालेली ‘गोडसे ज्ञानशाला’ पोलिसांनी केली बंद


ग्वाल्हेर – मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर येथे महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या नावाने ज्ञानशाळा उघडण्यात आली होती. गोडसे यांची विचारधारा या ज्ञानशाळेत युवकांना शिकवण्यात येणार होती. नथुराम गोडसे यांच्या नावाने गोडसे ज्ञानशाळेत जयजयकार करण्यात आला. तसेच उद्धाटनावेळी उपस्थित पाहुण्यांनी नथुराम गोडसेच्या देशभक्तीबद्दलचे किस्से लोकांना सांगितले. पण आता दोन दिवसांपूर्वी सुरू झालेली ‘गोडसे ज्ञानशाळा’ बंद करण्यात आल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते.

मंगळवारी ग्वाल्हेर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करत ही गोडसे ज्ञानशाळा बंद केली आहे. ‘गोडसे ज्ञानशाळा’ हिंदू महासभेने दौलतगंज स्थित आपल्या कार्यालयात सुरू केली होती. याला सोशल मीडियावर जोरदार विरोध केला जात होता. याबाबत अधिक माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच कलम 144 या भागात लागू करून कोणत्याही प्रकारे शांतता भंग होऊ न देण्याचे निर्देश दिले. हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्याशी प्रशासनाकडून चर्चा करण्यात आली. त्यानंतर हिंदू गोडसे ज्ञानशाळा बंद केल्याची माहिती मिळत आहे.

साहित्य, पोस्टर्स आणि इतर साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती देखील अधिकाऱ्यांनी दिली आहे. हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला की हिंदू महासभा भवन दौलतगंज ग्वाल्हेरमध्ये राष्ट्रभक्तांसाठी प्रेरणास्रोत आयोजन सुरू राहतील. गोडसे ज्ञानशाळा संचालित केली जाणार नाही, असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. जयवीर भारद्वाज यांनी म्हटले आहे. नथुराम गोडसे यांच्यासोबत अनेक महापुरुषांचे फोटोदेखील जोडण्यात आले, ग्वाल्हेरच्या दौलतगंज परिसरात हिंदू महासभेच्या कार्यालयात ही कार्यशाळा सुरू करण्यात आली होती.