दिल्लीकरांना मोफत लस उपलब्ध करुन देणार दिल्ली सरकार


नवी दिल्ली – देशातील जनतेला कोरोनाची लस मोफत देण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. जर जनतेला मोफत लस केंद्राने दिली नाही, तर दिल्लीकरांना मोफत लस दिल्ली सरकार उपलब्ध करुन देईल, अशी घोषणाच यावेळी केजरीवालांनी केली आहे.

याआधीपासून केंद्राकडे मोफत लस देण्याची मागणी केजरीवाल करत आहेत. पण अद्याप त्याबाबत केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. बुधवारी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा केजरीवाल यांनी मोफत लसीकरणाचा मुद्दा उचलून धरला. देशातील गरीबीचे प्रमाण अधिक आहे आणि गेल्या १०० वर्षांमध्ये पहिल्यांदाच अशा महाभयंकर महामारीचा सामना देशातील जनता करत आहे. लशीचा खर्च न परवडणारेही बहुसंख्य लोक देशात असल्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला कोरोनाची लस मोफत द्यावी अशी मागणी केंद्राकडे केली होती. याबाबत केंद्राकडून काय निर्णय घेतला जातो याची वाट आम्ही पाहत आहोत. जर केंद्राने मोफत लस उपलब्ध करुन दिली नाही. तर दिल्ली सरकार दिल्लीतील नागरिकांच्या लसीकरणाचा खर्च करेल, असे अरविंद केजरीवाल म्हणाले.