कोरोना लसीच्या वितरणासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज : महापौर


मुंबई: कोरोना प्रतिबंधक लस ही कलियुगातील संजीवनी असून मुंबईत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड लस दाखल झाली आहे. लस वितरणासाठी महानगरपालिका देखील सज्ज झाली असल्याची माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. किशोरी पेडणेकर कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

मुंबईत कलियुगातील संजीवनी आली आहे. आता घाबरायचे कारण नाही. काळजी करू नका. यामुळे कोरोना नियंत्रणात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. मुंबईत सीरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड कोरोना लस दाखल झाली आहे. एकूण ०१ लाख ३९ हजार ५०० लस मुंबईत आल्या आहेत. मुंबईतील ९ ठिकाणी लसीकरण केंद्र सज्ज करण्यात आलेली आहेत. पाच टप्पे कोरोना लसीकरणासाठी निश्चित करण्यात आले आहेत. आधीपासूनच मुंबई महापालिकेने तयारी केली होती. मुंबईत एकूण ०१ लाख ३० हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले.

परळच्या कोल्ड स्टोअरमध्ये मुंबईत दाखल झालेली कोरोना लस ठेवण्यात येणार आहे. यानंतर ९ केंद्रांवर लसीचे वितरण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. पहिल्या टप्प्यातील लोकांना लस देता येईल. या पार्श्वभूमीवर ८ सेंटर तयार असून, आणखी ८ सेंटर लवकरच तयार करण्यात येत आहेत. घाटकोपरमधील राजावाडी रुग्णालय हे दोन सेंटरमध्ये काम करेल. मुंबईत जवळपास ५० सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. हे प्रत्येक सेंटर २ शिफ्टमध्ये काम करणार असल्याची माहिती मिळाली आहे. लसीकरणानंतरही सर्वांना मास्क घालणे बंधनकारक असेल, असेही किशोरी पेडणेकर यांनी नमूद केले.