ट्रम्प यांचे खाते सिग्नेचर बँकेने गोठवले

डोनल्ड ट्रम्प यांची अध्यक्षपद सोडण्याची घटिका जवळ येत चालली असून २० जानेवारी रोजी बायडेन अध्यक्ष होतील आणि ट्रम्प यांचे अध्यक्षपद जाईल. मात्र त्यापूर्वीच ट्रम्प यांच्या व्यवसायाचा मार्ग अधिक दुष्कर होणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सिग्नेचर बँकेने डोनल्ड ट्रम्प यांचे वैयक्तिक खाते सोमवारी म्हणजे ११ जानेवारीला बंद केले असल्याचे जाहीर केले आहे. कॅपिटल हिल घटनेने ट्रम्प यांच्या सर्व प्रॉपर्टीज संकटात सापडतील अशी लक्षणे दिसू लागली आहेत.

यात सर्वात महत्वाची आहे ती पोस्ट ऑफिसच्यावर वॉशिंग्टन डीसी मध्ये त्यांनी सुरु केलेले हॉटेल. गेली चार वर्षे ट्रम्प यांच्या बरोबरच्या व्यवसायासाठी विदेशी सरकारनी येथेच रुम्स बुक केल्या होत्या. अनेक कार्यक्रमांचे आयोजन येथे झाले होते. सरकारी मालमत्तेत हॉटेल सुरु करणे कायद्याविरोधात आहे मात्र तरीही ट्रम्प यांनी ते सुरु केले होते.

ट्रम्प यांच्याबरोबर बिझिनेस न करण्याचा निर्णय अनेक कंपन्या आणि बँकांनी घेतला असल्याचे सांगितले जात आहे. ट्रम्प यांच्या ऑर्गनायझेशनना कर्ज पुरवठा न करण्याचा निर्णय सुद्धा अनेक बँकांनी घेतला आहे. न्युयॉर्क टाईम्सच्या बातमीनुसार ट्रम्प वैयक्तिक जामीन असलेल्या कर्जाची रक्कम ४२.१ कोटी डॉलर्स आहे. यातील बहुतेक कर्जे दुसऱ्या देशातील बँका, कंपन्याकडून घेतली गेली आहेत.

अमेरिका एक्सप्रेस, ब्ल्यू क्रॉस, ब्ल्यू शिल्ड, कॉमर्स बँक, डाऊ केमिकल, मॅरीअट, अमेझॉन या कंपन्यांनी रिपब्लिकन कॉंग्रेस सदस्यांना डोनेशन न देण्याचा निर्णय घेतला असून यात १४७ विविध कंपन्या सामील आहेत.

ट्रम्प यांचे विविध प्रकारचे ५०० व्यवसाय आहेत. त्यात हॉटेल्स, रिसोर्ट, गोल्फ क्लब यांचा समावेश असून मुंबई आणि पुणे येथेही ट्रम्प टॉवर उभारले गेले आहेत. पुण्यात त्यांचे भागीदार पंचशील आहेत. पुण्यात २३ मजली ट्रम्प टॉवर्स इमारतीत अलिशान सदनिका असून देशातील ही पहिली इको फ्रेंडली इमारत आहे. यात अनेक बॉलीवूड तारे तारकांनी सदनिका घेतल्या असून एका सदनिकेची किंमत १५ कोटी आहे.