टेस्ला भारतात आली

फोटो साभार इकोनॉमिक टाईम्स

अवघ्या चार दिवसांसाठी जगातील एक नंबरचे धनकुबेर ठरलेल्या एलन मस्क यांच्या टेस्लाने भारतात प्रवेश केला आहे. टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रा.लिमिटेड नावाने या कंपनीची नोंदणी केली गेली असून त्याचे कार्यालय बंगलोर येथे स्थापन केले गेले आहे. येथेच कंपनी त्यांच्या लग्झरी कार्सचे उत्पादन आणि संशोधन विकास केंद्र चालविणार आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरुप्पा यांनी टेस्लाचे स्वागत केले आहे. कंपनीचे सीएफओ वैभव तनेजा म्हणाले, कंपनीची नोंदणी ८ जानेवारी रोजी केली गेली आहे. कंपनी या वर्षात भारतात तीन मॉडेल सादर करेल. वर्षाच्या अखेरच्या तिमाहीत या कार्सची डिलीव्हरी केली जाईल.

टेस्लाचे सीएओ एलन मस्क यांनी गतवर्षी ऑक्टोबर मध्ये ट्विटरवरून २०२१ मध्ये टेस्ला भारतात प्रवेश करेल असे ट्वीट केले होते. केंद्रीय रस्ते बांधणी आणि विकास मंत्री नितीन गडकरी यांनीही या बातमीला दुजोरा दिला होता. भारत येत्या पाच वर्षात दुनियेतील सर्वात मोठे इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाचे केंद्र बनेल असेही गडकरी यांनी सांगितले होते.

टेस्लाने करोना काळात सुद्धा २०२० मध्ये जवळजवळ ५ लाख कार्स विकल्या आहेत. या वर्षात कंपनीची उलाढाल ३६ टक्क्याने वाढली होती. टेस्लाचे प्रमुख एलोन मस्क गुरुवारी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले होते पण सोमवारी टेस्लाचा शेअर ८ टक्क्याने घसरल्याने ते पुन्हा दोन नंबरवर गेले आहेत. अमेझॉनचे जेफ बेजोस पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत ठरले आहेत.