आराम तर आराम शिवाय भरभक्कम कमाई

नोकरी करणे म्हणजे अनेकांसाठी कटकटीचे काम असते. दिवसातले ८-९ तास कष्ट केल्यावर महिन्याकाठी काही हजार रुपये हातात पडणार म्हणजे नोकरी करून श्रीमंत होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असेही अनेकांना वाटते. पण युके मधील एका कंपनीने घरी बसून आराम शिवाय भरभक्कम कमाई देणारी एक नोकरी उपलब्ध केली आहे. त्यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

नोकरीचे स्वरूप थोडे वेगळे आहे. अॅथलेटिक्स कंपनीने ही नोकरी देऊ केली आहे. त्यात तुम्ही फक्त त्यांच्या कंपनीच्या स्लीपर घालून बसायचे आहे आणि त्या स्लीपरचा रिव्यू कंपनीला द्यायचा आहे. घरबसल्या आराम करताना सुद्धा हे काम होऊ शकणार आहे आणि त्याबदल्यात वर्षाला ४ लाख रुपये पगार मिळणार आहे. स्लीपर टेस्टर असे या पदाचे नाव आहे. सध्या दोन लोकांसाठी जागा असून त्यातील एक पुरुष हवा तर दुसरी महिला हवी.

अर्थात या नोकरीसाठी सुद्धा पात्रता आहे. उमेदवाराला स्लीपर्स बद्दल आवश्यक ती सर्व माहिती असायला हवी. लोफर आणि अन्य स्लीपर्स बद्दल सुद्धा माहिती हवी. चप्पल घालून घरात किती वेळ आरामात राहू शकतो याची माहिती कंपनीला द्यावी लागेल. अशी नोकरी उपलब्ध करण्यामागे ग्राहकांना चांगल्या क्वालिटीच्या चप्पल मिळाव्यात हा हेतू असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.