१० वेगवेगळ्या गुन्ह्यात तुर्कीतील धार्मिक नेत्याला १०७५ वर्षाची शिक्षा!


इस्तांबुल: इस्तांबुलमधील न्यायालयाने १० वेगवेगळ्या गुन्ह्यात मुस्लिम पंथाचा नेता अदनान ओकताराला तब्बल १०७५ वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. तुर्कीतील एका पंथाचा अदनान हा प्रमुख आहे. देशभरात सुरक्षा यंत्रणांनी वर्ष २०१८ मध्ये छापेमारी केली होती. अदनानच्या पंथातील अनेकांना त्यावेळी अटक करण्यात आली होती. अदनान ओकतारच्या एक हजार गर्लफ्रेंड असल्याचेही सांगितले जाते.

त्याच्याविरोधात तो चालवत असलेली संघटना, पंथ बेकायदेशीर असल्याची तक्रार करण्यात आली होती. लोकांमध्ये कट्टरतावादी मते व्यक्त करून अदनान ओकतार लोकांना उपदेश करत असे. तो महिलांना मांजरी असे संबोधत होता. या महिलांसोबत अदनान टीव्ही शोमध्ये डान्सही करत असे. यासंदर्भात एनटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण, फसवणूक करणे आणि राजकीय व सैन्याच्या माहितीची हेरगिरी करणे आदी आरोप अदनानवर ठेवण्यात आले होते. हा खटला जवळपास २३६ जणांविरोधात चालवण्यात आला. त्यातील ७८ जणांना अटक करण्यात आली आहे.

अदनानचे बरेच बिंग या खटल्याच्या सुनावणी दरम्यान फुटले. डिसेंबरमध्ये झालेल्या सुनावणीत अदनानने कोर्टाला सांगितले की, त्याला जवळपास एक हजार गर्लफ्रेंड असून माझ्या हृदयात महिलांच्या प्रती प्रेम उफाळून येते. प्रेम करणे हे मनुष्याचे वैशिष्ट्य आहे. माझ्याकडे बाप बनण्याची एक असाधारण क्षमता असल्याचे त्याने कोर्टाला सांगितले.

१९९० च्या दशकात पहिल्यांदा अदनान प्रकाशझोतात आला होता. तो त्यावेळी सेक्स स्कँडलमध्ये फसलेल्या एका पंथाचा नेता होता. वर्ष २०११ मध्ये त्याने एक टीव्ही चॅनेल सुरू केले होते. तुर्कीतील अनेक धार्मिक नेत्यांनी त्यावेळी त्याच्यावर टीकेची झोड उठवली होती. एका महिलेने सांगितले की, अदनानने अनेकदा तिच्यासह इतर महिलांचे लैंगिक शोषण केले. अनेक महिलांवर पाशवी बलात्कारही केले. त्याशिवाय त्यांना गर्भनिरोधक औषधेही खाण्यास भाग पाडले गेले. अदनानच्या घरातून ६९ हजार गर्भनिरोधक गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.