तुर्की राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी दिले व्हॉट्सअ‍ॅपचा वापर बंद करण्याचे आदेश


अंकारा – राष्ट्राध्यक्ष इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या व्हॉट्सअ‍ॅपचा प्लॅटफॉर्म सोडत असल्याची घोषणा तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष तय्यिप एर्डोगन यांच्या प्रसारमाध्यमांसंदर्भातील विभागाने केली आहे. त्याचबरोबर यापुढे आपण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करणार नसल्याचे तुर्कीच्या संरक्षण मंत्रालयानेही स्पष्ट केले आहे. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच आपली प्रायव्हसी पॉलिसी म्हणजेच खासगी माहितीसंदर्भात धोरणामध्ये बदल केला. त्याचबरोबर व्हॉट्सअ‍ॅपने या नवीन धोरणांमधील अटी मान्य नसतील तर यूझरचे अकाऊंट डिलीट केले जाईल, असे सांगितले आहे. फेसबुकबरोबरच कंपनीच्या इतर फ्लॅटफॉर्मवर व्हॉट्सअ‍ॅपच्या या नवीन अटी आणि धोरणांसाठी मंजुरी दिल्यानंतर यूझर्सची संपूर्ण खासगी माहिती शेअर केली जाईल. पण अनेक युझर्स यामुळे आपल्या खासगी माहितीसंदर्भात चिंतेत असल्याचे चित्र दिसत आहे.

यासंदर्भातील वृत्त ब्लूमबर्गने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ११ जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्ष एर्डोगन यांनी आपले व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप इनस्क्रिप्टेड मेसेजिंग अ‍ॅप असणाऱ्या बीपवर (BiP) ट्रान्सफर करण्याचे आदेश दिले. बीप हे तुर्कीमधील एक इनस्क्रिप्टेड अ‍ॅप असून तुर्कसेल इलेटिसिम हिजमेटलेरी एएस या तुर्कीमधील कंपनीकडेच या अ‍ॅपची मालकी आहे. आता या बीप अ‍ॅपवरुनच तुर्कीमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून तसेच संरक्षण मंत्रालयासंदर्भातील सूचना केल्या जातील.

व्हॉट्सअ‍ॅप सोडल्याची घोषणा राष्ट्राध्यक्षांनी केल्यानंतर देशामध्ये अमेरिकन कंपनीच्या मालकीच्या या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपसंदर्भात आवाज उठू लागला आहे. देशातील लाखो व्ह़ॉट्सअ‍ॅप युझर्सने व्हॉट्सअ‍ॅप बंद करुन बीपकडे आपला मोर्चा वळवला आहे. रविवारी तुर्कसेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १० लाखांहून अधिक नवीन युझर्सने २४ तासांमध्ये हे मेसेंजर अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. २०१३ साली लॉन्च करण्यात आलेले हे अ‍ॅप ५३ लाखांहून अधिक जणांनी डाऊनलोड केल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. पण व्हॉट्सअ‍ॅपला होत असणारा विरोध बीपसाठी फायद्याचा ठरत असल्याचे दिसत आहे. तुर्कीमधील जनता आता देशी बनावटीच्या अ‍ॅपला प्राधान्य देत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.