वॉशिंग्टन – अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटॉल इमारतीत बुधवारी झालेल्या हिंसाचारामुळे तणावाचे वातावरण असतानाच अजून एक महत्वाची माहिती समोर आली आहे. ट्रम्प समर्थकांकडून वॉशिंग्टन डीसी तसेच इतर ५० राज्यांमध्ये जो बायडन यांच्या शपथविधीआधी सशस्त्र आंदोलन केले जाण्याची शक्यता एफबीआयने वर्तवली असल्याचे वृत्त रॉयटर्सने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.
FBIने वर्तवली वॉशिंग्टन डीसी तसेच इतर ५० राज्यांमध्ये सशस्त्र आंदोलनाची शक्यता
मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांकडून पुन्हा हिंसक आंदोलन होण्याची शक्यता असल्याने सुरक्षेची पूर्ण तयारी कॅपिटॉल इमारतीबाहेर झालेल्या हिंसाचारानंतर सतर्क असलेल्या एफबीआयने केली आहे. जवळपास १५ हजार तुकड्या वॉशिंग्टनला सुरक्षेसाठी तैनात केल्या जाणार आहेत. याशिवाय वॉशिंग्टन स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना २४ जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
‘अमेरिका युनायटेड’ ही मुख्य संकल्पना जो बायडन यांच्या शपथविधीला असेल, अशी माहिती त्यांच्या टीमकडून देण्यात आली आहे. एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, १६ जानेवारी ते २० जानेवारी या कार्यकाळात एफबीआयने हिंसक आंदोलनाची शक्यता वर्तवली असून शपथविधी झाल्यानंतर पुढील तीन दिवसांसाठीही हा इशारा कायम आहे.
यासंदर्भात नॅशनल गार्ड ब्युरोचे प्रमुख जनरल डॅनियल यांनी दिलेल्या माहितीनुसार, वॉशिंग्टनमध्ये शनिवारपर्यंत जवळपास १० हजार तुकड्या उपस्थित असतील. सुरक्षा, लॉजिस्टिक अशा गोष्टींसाठी मदत करण्यावर त्यांचा भर असेल. जर स्थानिक प्रशासनाने मागणी केली तर ही संख्या १५ हजारांपर्यंतही जाऊ शकते.