मुंबई – एनसीबीकडून ड्रग्ज तस्करी प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. या प्रकरणात आता मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाचे देखील नाव गुंतल्याचे उघड झाले आहे. मुच्छड पानवालाला एनसीबीकडून समन्स बजावण्यात आले होते, त्यानुसार एनसीबीने काल त्याची चौकशी केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. मुंबईतील साऊथ कॅम्प्स कॉर्नर येथे मुच्छड पानवालाचे दुकान असून हे दुकान जयशंकर तिवारी यांचे आहे. मुंबईमध्ये मुच्छड पानवालाचे नाव खूप प्रसिद्ध आहे.
ड्रग्ज तस्करी प्रकरणी मुंबईतील प्रसिद्ध मुच्छड पानवालाला एनसीबीने केली अटक
या मुच्छड पानवाल्याचे बॉलिवूडचे अनेक दिग्गज कलाकार, अनेक बडे उद्योगपती ग्राहक आहेत. प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ हा सुद्धा याच पानवाल्याकडून नेहमी पान खातो. त्याचबरोबर अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या घरी येथूनच पान जाते. उत्तर प्रदेशातील तिवारीपूरचे तिसऱ्या पिढीतील जयशंकर तिवारी सध्या हे दुकान चालवतात. मुंबईतील नेपियन्सी रोड, मुंबई सेंटर आणि खेतवाडीमध्ये मुच्छड पानवाला यांनी आपल्या दुकानाची शाखा सुरु केली आहे.
तिवारी यांच्या दुकानाचे नाव एक ब्रिटीश नागरिक करण सजनानीने चालवलेल्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने घेतल्यामुळे एनसीबीने त्यांना समन्स पाठवून सोमवारी बोलावले होते. करण सजनानी या ब्रिटिश नागरिक आणि अन्य दोन महिलांना अटक केली होती. अटक केलेल्या महिलांपैकी एकाची ओळख रहिला फर्निचरवाला असे आहे, जी यापूर्वी बॉलिवूड अभिनेत्रीसाठी मॅनेजर म्हणून काम करीत होती.