251 रुपयांमध्ये मोबाईल देणाऱ्या मोहित गोयलने लावला 200 कोटींचा चुना


नवी दिल्ली – तुमच्या लक्षात असेल की नाही माहित नाही, पण आम्ही तुम्हाला आठवण करुन देतो. साधारणतः साधारण चार-पाच वर्षांपूर्वी 251 रुपयात मिळणार असल्याची एक भन्नाट ऑफर चर्चेत आली होती. नोएडातील रिंगिंग बेल या कंपनीने स्मार्टफोन 251 रुपयांत देण्याची स्कीम आणली होती. या फोनसाठी तुम्ही, तुमच्या नातेवाईकांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशनही केले होते. त्याचे पुढे काय झाले? तो फोन आला की नाही याची माहिती कोणालाच नाही.

एक एफएमसीजी प्रॉडक्टची उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये सेक्टर 62 मध्ये बोगस कंपनी काढली होती. त्याने याद्वारेही 200 कोटी रुपयांचा चुना लावला आहे. पोलिसांनी रिंगिंग बेलचा एमडी मोहित गोयल आणि ओमप्रकाश जांगीड यांना अटक केली आहे. 2015 मध्ये केवळ 250 रुपयांत अँड्रॉईड फोन देण्याच्या नावाखाली रिंगिंग बेलने कंपनीने करोडो रुपयांना ठकविले होते.

एक ऑडी कार, एक इनोव्हा कार आणि 60 किलो ड्राय फ्रूटचे सँम्पल आणि कागदपत्रे पोलिसांनी आरोपींकडून जप्त केली आहेत. याबाबत माहिती देताना अतिरिक्त पोलीस आयुक्त लव कुमार यांनी सांगितले की, सेक्टर-62 मधील कोरेंथम टॉवरमध्ये आरोपींनी दुबई ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हब नावाची कंपनी उघडली होती. या कंपनीचा जांगिडला एमडी बनविले होते. तर या कंपनीचा मोहित प्रमोटर होता.

देशभरातून ड्राय फ्रूट, डाळ, तेल, मसाले आदी हे दोघे खरेदी करत होते. या विक्रेत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी ते त्यांना काही प्रमाणावर पैसे आगाऊ देत असत. यानंतर लाखो रुपयांचा माल विक्रेत्यांकडून उचलत असत, पण त्यानंतर विक्रेत्यांना ते पैसे देत नव्हते. जवळपास 500 कोटींवर ही फसवणूक जाण्याची शक्यता आहे. ड्राय फ्रूट्स आणि स्पाईस हबच्या 14 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात व्यापारी रोहित मोहन यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर हा गोरखधंदा उघड झाला आहे. हा धंदा 2018 पासून सुरु केला होता.

जेव्हा त्यांच्याकडे पैसे मागण्यासाठी फसवणूक झालेले व्यापारी यायचे, तेव्हा हे लोक गँगस्टर, बाऊन्सरांची मदत घेत होते. तसेच या व्यापाऱ्यांविरोधात खोटे गुन्हे दाखल करून त्यांना त्रास द्यायचे. रिंगिंग बेलचा एमडी मोहित राजस्थानच्या पाच व्यापाऱ्यांना फसवून त्यांच्याकडून उलट 25 लाख रुपये वसूल करण्याच्या आरोपाखाली दिल्लीच्या तुरुंगाची हवा खाऊन आला आहे.

परदेशातील महिलेला कंपनीमध्ये भामट्याने रिसेप्शनिस्ट ठेवले होते. भलेमोठे पॅकेज तिला देण्यात आले होते. तसेच ऑफिसमध्ये 56 लोक काम करत होते. 25 लाख रुपये महिना पगार त्यांना दिला जात होता. त्याचबरोबर डील करणाऱ्या दलालाला दोन टक्के कमिशनही दिले जात होते. ऑफिसवर लावलेल्या बोर्डाची किंमतच पाच लाख रुपये होती. अशा प्रकारे हाय़फाय थाट दाखवून व्यापाऱ्यांना लुटले जात होते.