एप्रिलमध्ये सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेककडून लसीचे आणखी 4.5 कोटी डोस खरेदी करणार सरकार


नवी दिल्ली – कोरोना लसीच्या 1 कोटी 50 लाख डोसची पहिली ऑर्डर केंद्र सरकारने दिली असून पुण्याच्या सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडियाकडून (SII) 1 कोटी 10 लाख डोस खरेदी केले जातील, तर हैदराबादच्या भारत बायोटेकला 38 लाख 50 हजार डोसची ऑर्डर दिली आहे. 14-15 जानेवारीपर्यंत लसीची पहिली खेप सर्व सेंटर्सवर पोहोचेल.

16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सरकारच्या वतीने लसीचे डोस सरकारी कंपनी एचएलएल लाइफकेअर खरेदी करेल. मीडिया रिपोर्ट्सनुसार कोव्हिशिल्डची किंमत 220 रुपये प्रति डोस, तर कोव्हॅक्सिनचा एक डोस 309 रुपयांना असेल. सर्व करांचा यामध्ये समावेश आहे. एप्रिल महिन्यात सीरमकडून सरकार कोव्हिशिल्डचे आणखी 4 कोटी 50 लाख डोस खरेदी करणार आहे.

तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर्सना पहिल्या टप्प्यात लस दिली जाणार आहे. यानंतर 27 कोटी उच्च जोखमीच्या गटात समाविष्ट असलेल्या लोकांना ही लस मिळेल. या गटात, 50 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील आणि तसेच जास्त जोखीम असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल. दरम्यान पहिल्या टप्प्यात ही लस विनामूल्य दिली जाईल आणि संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलेल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

सीरम इन्स्टिट्यूटमध्ये बनवलेल्या 6 कोटी डोस मनुष्यांवर वापरण्यास परवानगी सेंट्रल ड्रग लॅबोरेटरीने (CDL) दिली आहे. सर्व प्रथम, त्यांना पुरवठा केला जात आहे. त्याचबरोबर सीडीएलने कोव्हॅक्सिनच्या 2.4 लाख डोसलाही मंजुरी दिली आहे. 3 जानेवारी रोजी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनला ड्रग रेग्युलेटरने आपातकालीन वापरासाठी मंजुरी दिली होती.