चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा प्रकोप; लॉकडाऊनमध्ये वाढ


बिजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रकोप वाढला असून तेथील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्यामुळे तेथील लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर बिजिंगमध्ये होणाऱ्या सर्व राजकीय परिषद रद्द करण्यात आल्या आहेत.

बिजिंगच्या दक्षिणेला असलेल्या गुआन शहरातील नागरिकांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून हे आदेश पुढील सात दिवसांसाठी जारी करण्यात आले आहेत. अनेक कडक निर्बंध वुहान प्रांतातही लादण्यात आले आहेत. चीनच्या वुहान प्रांतातच कोरोना व्हायरसाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर आज या विषाणूचा संपूर्ण जग सामना करत आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात हुबेई येथे होणारी पीपल्स काँग्रेस आणि सल्लागार समितीची परिषद देखील रद्द करण्यात आली आहे. मंगळवारी ४० नवे कोरोना रुग्ण हुबेई येथे आढळून आल्याची माहिती तेथील आरोग्य विभागाने दिली आहे.

याबाबत स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एका लग्नसोहळ्यानंतर उपस्थित असलेल्या ३०० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचाही रुग्ण बिजिंगमध्ये आढळला आहे. चीनने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ८७,५९१ एवढी झाली आहे. तर ४,६३४ जणांचा मृत्यू झाला आहे. वाढच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर आता नागरिकांच्या प्रवासावर निर्बंध आणण्यात आले आहेत. तर शाळा देखील बंद करण्यात आल्या आहेत.