विहारी, जाडेजा यांच्यानंतर आणखी एक खेळाडू दुखापतग्रस्त


सिडनी – ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाला दुखापतीचे ग्रहण लागले असून रविंद्र जाडेजा आणि हनुमा विहारी यांना तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापत झाल्यामुळे अडचणीत असलेल्या भारतीय संघाला आणखी एक मोठा झटका लागला आहे. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहदेखील दुखापतग्रस्त झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुमराहाला सिडनी कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना एबडॉमिनल स्ट्रेनचा त्रास झाल्यामुळे तो अखेरच्या कसोटी सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान १५ जानेवारीपासून ब्रिस्बेन येथे अखेरचा कसोटी सामना होणार आहे. बुमराहाला त्यापूर्वीच दुखापत झाल्यामुळे भारतीय संघासमोर आणखी एक आव्हान उभे राहिले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहचे तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर स्कॅन करण्यात आले. स्कॅन रिपोर्टमध्ये स्ट्रेन दिसून येत आहेत. बुमराहच्या बाबतीत कोणताही धोका घेण्याच्या तयारीत भारतीय संघ व्यवस्थापन नाही. बुमराहाला भारतात होणाऱ्या आगामी इंग्लंड दौऱ्याचा विचार करुन चौथ्या कसोटी सामन्यात आराम देण्यात येणार आहे. पीटीआयला बीसीसीआयच्या एका सुत्राने सांगितले की, सिडनी कसोटीत क्षेत्ररक्षण करत असाताना जसप्रीत बुमराहला एबडॉमिनल स्ट्रेन झाल्यामुळे तो आता ब्रिस्बेन कसोटीत खेळणार नाही. पण मायदेशात इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी बुमराह उपलब्ध असणार आहे.

बुमराहच्या अनुपस्थितीत वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भारतीय वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. त्यासोबत नवदीप सैनीही असणार आहे. बुमराहच्या जागी नटराजनला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रविंद्र जाडेजाच्या जागी शार्दुल ठाकूर तर बुमराहच्या जागी नटराजनला अंतिम ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे.