आजारी पडल्यावर सोशल डीस्टन्सिंग पाळणाऱ्या शहाण्या मुंग्या

फोटो साभार हाफ पोस्ट

करोनाचा फैलाव होऊ लागल्यावर सोशल डीस्टन्सिंग, आयसोलेशनचे महत्व मानव जातीला चांगलेच उमजले आहे मात्र अजून त्यांच्या वर्तणुकीत म्हणावी तशी सुधारणा होताना दिसत नाही. माणसाच्या तुलनेत क्षुद्र म्हणाव्यात अश्या मुंग्या मात्र या बाबतीत माणसापेक्षा खुपच शहाण्या आहेत असे संशोधनातून सिध्द झाले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ लुसेने मधील संशोधकांनी लेसियार नायझार या जातीच्या मुंग्यांवर संशोधन करून काही निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यांनी २२०० मुंग्या असलेल्या मुंग्यांच्या वसाहतीत इन्फ्रारेड कॅमेरे लावून निरीक्षणे नोंदविली. मुंग्यांच्या हालचालीवर त्यांनी बारीक नजर ठेवली होती.

या संशोधकांनी एक प्रकारचे फंगस किंवा बुरशी या वारुळात ठेवली. १० टक्के मुंग्या या बुरशीच्या संपर्कात येतील याची काळजी घेतली गेली. वास्तविक या बुरशीच्या संपर्कात आल्यास मुंग्या १ ते २ दिवसात मरतात. त्यामुळे मुंग्या मरु नयेत तर फक्त आजारी पडाव्यात इतक्याच प्रमाणात ही बुरशी ठेवली गेली होती. त्याप्रमाणे बुरशीच्या संपर्कात आलेल्या ज्या मुंग्या आजारी झाल्या त्यांची वर्तणूक बघून हे संशोधक चकित झाले.

आजारी मुंग्या लहान पिले, राणी माशी आणि त्यांच्या अन्य सहकारी मुंग्यापासून वेगळ्या झाल्या आणि बाकीच्यांना संसर्ग होऊ नये याची काळजी त्यांनी घेतली. आजारी झालेल्या सर्व मुंग्या एकत्र राहिल्या आणि या आजारी मुंग्यांना बाकी मुंग्यांनी आयसोलेट केले नाही तर त्यांची सर्व प्रकारे काळजी घेतली. त्यांची कामे वाटून घेतली असे दिसून आले.