सौदीत उभारले जातेय रस्ते, कार नसलेले शहर

सौदी अरेबियामध्ये लाल समुद्राच्या काठी भविष्यातील अत्याधुनिक शहर उभारणीच्या कामाने वेग घेतला असून या साठी आखलेल्या ‘द लाईन’ योजनेची घोषणा प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी केली आहे. ते स्वतः जातीने या शहराच्या उभारणीवर लक्ष ठेऊन आहेत. या शहराचे नामकरण नियोम असे केले आहे. हा ग्रीक शब्द असून त्याचा अर्थ नवा असा आहे. २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उदिष्ट ठेवले गेले आहे.

१७० किलोमीटर परिसरात वसविले जात असलेले हे शहर न्युयॉर्कपेक्षा ३३ पटीने मोठे असेल. या शहरात कार नसतील, रस्ते नसतील आणि कार्बन उत्सर्जन शून्य असेल. या शहरात १० लाख नागरिक राहू शकतील आणि निसर्गाचे ९५ टक्के संरक्षण केले जाईल. या शहराच्या उभारणीसाठी सरकार ५०० अब्ज डॉलर्स खर्च करणार आहे शिवाय परकीय गुंतवणूक घेतली जाणार आहे.

या शहराची वैशिष्टे अशी असतील की येथे कृत्रिम चंद्र असेल. कृत्रिम पाउस पाडला जाईल, रोबोटिक मोलकरणी असतील, शिक्षण, सार्वजनिक परिवहनाच्या उत्तम सोयी असतील. फ्लाईंग कार्स असतील. प्रिन्स मोहम्मद म्हणतात, कार्बन उत्सर्जन, समुद्र पातळीतील वाढ यामुळे २०५० पर्यंत १ अब्ज जनतेला दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जावे लागणार आहे. आज ९० टक्के लोक प्रदुषित हवेत श्वास घेत आहेत आणि प्रदूषणामुळे दरवर्षी ७० लाख जणांचे बळी जात आहेत. वाहतूक समस्येमुळे दरवर्षी १० लाख लोक मृत्युमुखी पडत आहेत. अश्या परिस्थितीत नियोम सारखी शहरे हवीत. या शहराच्या उभारणीत आर्टिफीशीयल टेक्नोलॉजी महत्वाची भूमिका बजावेल.