भारतातील या नदीतून वाहते सोने

फोटो साभार झी न्यूज

भारतात नद्यांना पवित्र मानले जाते आणि भारतीय जनमानसात नदीला माता असे स्थान आहे. अनेक नद्यांचे पाणी पवित्र मानले जातेच पण येथे एक नदी अशीही आहे जिच्यातून सोन्याचे पाणी वाहते. होय झारखंड मधील रत्नगर्भा भागातून वाहणारी स्वर्णरेखा किंवा सुवर्णरेखा या नदीत सोने सापडते आणि अनेक आदिवासी हे सोने शोधून त्यांची उपजीविका करतात. वर्षानुवर्षे याच पद्धतीने हे आदिवासी जगत आहेत.

झारखंड, प.बंगाल आणि ओडीशा राज्याच्या काही भागातून ही नदी वाहते. दक्षिण पश्चिम स्थित नगडी गावात राणी चुआ नावाच्या जागी ही नदी उगम पावते आणि बंगालच्या खाडीला जाऊन मिळते. या नदीची लांबी ४७४ किलोमीटर आहे. या नदीच्या उपनदीचे नाव करकरी आहे. स्थानिक लोकांच्या मते सुवर्णरेखा नदीच्या वाळूत जे सोने सापडते ते करकरी नदीतून येते. पण प्रत्यक्षात हे सोने कुठून येते हे रहस्य आजही कायम आहे.

या नदीच्या जवळ राहणारे आदिवासी वाळू चाळून सोन्याचे कण गोळा करतात. पावसाळा सोडला तर बाकी आठ महिने येथे हेच काम केले जाते. एक व्यक्ती साधारण ७० ते ८० कण सोने गोळा करते. सोन्याचे हे कण तांदळाएवढ्या आकाराचे असतात. ते विकून येथील आदिवासी गुजराण करतात.