जगातील सर्व देशात मॅरेथॉन धावून निकने केले अनोखे रेकॉर्ड

फोटो साभार पत्रिका

ब्रिटनच्या ब्रिस्टल शहरातील ३० वर्षीय निक बटर याने जगातील सर्व १९६ देशात मॅरेथॉन पूर्ण करून अनोखे रेकॉर्ड केले आहे. त्यासाठी त्याला ६७४ दिवस लागले. शेवटची मॅरेथॉन अथेन्स येथे २६.२ मैल धावून त्याने पूर्ण केली. हटके काही तरी करायचे ठरविले असेल तर आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणत्याही पातळीवर माणूस तयारी करू शकतो याचे निक हे उत्तम उदाहरण ठरले आहे. निकच्या नावावर सर्व देशात मॅरेथॉन करणारा असे रेकॉर्ड नोंदले गेले आहे.

त्याने या उपक्रमाची सुरवात कॅनडातून केली होती. यासाठी त्याला त्याचा मित्र केविन वेबर याच्याकडून प्रेरणा मिळाली असे निक सांगतो. केविन प्रोस्टेट कॅन्सरने पिडीत आहे. त्याचा आजार पाहिल्यावर बँकर असणाऱ्या निकने स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हिशोबाने जगण्याचा निर्धार केला. जगभर केलेल्या मॅरेथॉन मधून त्याने १ कोटी ७९ लाख रुपयाचा फंड गोळा केला. हे पैसे निक कॅन्सर पिडीतांना दान करणार आहे.

निक सांगतो प्रत्येक देशात मॅरेथॉन धावायचा अनुभव खास होता. जेथे जेथे तो गेला तेथील जनतेकडून चांगला प्रतिसाद मिळाला. अनेक अडचणी आल्या, अनेकदा त्याला कुत्राने चावे घेतले, एकदा कारने टक्कर मारली पण या सर्व अडचणींचा त्याने मुकाबला केला. निकने आत्तापर्यंत ५९२ मॅरेथॉन केल्या आहेत.