अमेरिकन संसद हिंसाचाराबद्दल प्रथमच बोलल्या मेलेनिया

अमेरिकेच्या संसदेत ट्रम्प समर्थकांनी हल्ला करून केलेल्या हिंसाचाराबद्दल प्रथमच फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांनी मतप्रदर्शन केले आहे. व्हाईट हाउस ब्लॉगवर पोस्ट लिहिताना त्या म्हणतात, गेल्या आठवड्यात पती ट्रम्प यांच्या समर्थकांनी संसदेत घुसून केलेल्या हिंसाचारामुळे निराश आणि दुःख्खी झाले आहे. बुधवारी झालेल्या या प्रकाराबद्दल मेलेनिया पाच दिवसांनंतर बोलल्या आहेत पण याचवेळी त्यांनी काही लोकांवर सुद्धा निशाणा साधला आहे. त्या म्हणतात, या दुःखद घटनेचा वापर माझ्या संदर्भात अशोभनीय चर्चा करण्यासाठी आणि माझ्यावर वैयक्तिक टीका करण्यासाठी, खोटे भ्रामक आरोप करण्यासाठी केला गेला.

अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यावर ट्रम्प यांनी समर्थकांना चेतावणी दिल्याने त्यांचे समर्थक हिंसक झाले आणि त्यांनी संसदेत धुमाकूळ घातला होता. व्हाईट हाउस मधील मेलेनिया यांच्या सहाय्यक स्टेफानी विन्स्टन वुलकॉप यांनी गेल्या आठवड्यात लिहिलेल्या संपादकीय मध्ये फर्स्ट लेडी अमेरिकेच्या बरबादीत भागीदार असल्याचे म्हटले होते. मेलेनिया त्याला अनुसरून लिहितात,’ मी संसदेतील हिंसाचाराची निंदा करते. राजकारणात विचार वेगळे असू शकतात पण कोणत्याही प्रकारची हिंसा स्वीकारार्ह नाही. काहीही गैरसमज न होता राष्ट्राने यातून बाहेर पडले पाहिजे आणि आपली शान राखली पाहिजे.