व्हाईट हाउसमध्ये फर्स्ट लेडीच्या प्रसाधनगृहावर होणार ९ कोटींचा खर्च


वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन सत्ता सूत्रे हाती घेण्यापूर्वीच एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आले आहेत. कारण तब्बल १.२ दशलक्ष डॉलर म्हणजे जवळपास ९ कोटी रुपयांचा खर्च अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय असलेल्या व्हाइट हाउसमधील प्रसाधनगृहाच्या नुतनीकरणासाठी करण्यात येणार आहे. बायडेन या मुद्यामुळे विरोधकांच्या निशाण्यावर आले असून हा खर्च म्हणजे करदात्यांच्या पैशांचा चुराडा असल्याची टीका करण्यात येत आहे. फर्स्ट लेडीच्या वापरासाठी हे प्रसाधनगृह असल्याचे म्हटले जात आहे.

यासंदर्भात एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, फर्स्ट लेडीच्या कार्यालयाजवळ या प्रसाधनगृहाचे नुतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. कोणतीही माहिती या प्रसाधनगृहाच्या बांधकामाबाबतची देण्यात आली नाही. मे महिन्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. व्हाइट हाउसमध्ये जो बायडेन येण्याआधी साफसफाईसाठी एक लाख २७ हजार डॉलर मंजूर करण्यात आले होते.

जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केल्यानंतर २० जानेवारी रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. तर, बायडेन यांची पत्नी जिल बायडेन यादेखील फर्स्ट लेडी म्हणून एक विक्रम करणार आहेत. शिक्षक असलेल्या जिल बायडेन यांच्याकडे चार पदव्या असून त्या व्हाइट हाउसमध्ये ‘फर्स्ट लेडी’ म्हणून कर्तव्य बजावत असताना अध्यापनाचे काम सुरूच ठेवणार आहेत. एखादी फर्स्ट लेडी अमेरिकेच्या २३१ वर्षात पहिल्यांदाच व्हाइट हाउसबाहेर काम करून वेतन कमावणार आहे.

उत्तर व्हर्जिनिया कम्युनिटी कॉलेजमध्ये जिल बायडेन या इंग्रजीच्या पूर्णवेळ प्राध्यापिका आहेत. आपण अध्यापनाचे काम फर्स्ट लेडी झाल्यानंतरही सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी निवडणुकी दरम्यानच्या एका मुलाखतीत म्हटले होते. बायडेन हे बराक ओबामा यांच्या कार्यकाळात उपराष्ट्रपती होते. जिल बायडेन यांनी त्यावेळीही अध्यापनाचे काम सुरू ठेवले होते.