केंद्र सरकार उचलणार पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च : नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – येत्या १६ जानेवारीपासून देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतली होती. औषध महानियंत्रकांनी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन या लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर केंद्राने काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार प्रत्यक्षात आणला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. तसेच यावेळी पहिल्या ३ कोटी लोकांसाठी राबवल्या जाणाऱ्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

देशभरात १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरूवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच पार्श्वभूमीवर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. लोकांना आपल्याला जागरूक करत राहावेच लागणार असून कोरोना लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या डोसनंतरही हेच काम करावचे लागणार आहे. या लसीकरणावर वैज्ञानिकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार काम करत राहणार आहोत आणि त्याच दिशेने आपण पुढे जात असल्याचे यावेळी मोदी म्हणाले.

राज्यांसोबत चर्चा केल्यानंतरच लसीकरणाला कोणाला प्राधान्य द्यायचे हे ठरवले जाणार आहे. आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांनंतर फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात ३ कोटी आरोग्य कर्मचारी आणि फ्रन्टलाईन कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या लसीकरणाचा खर्च राज्यांना उचलावा लागणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवली जाणार आहे. पहिला डोस दिल्यानंतर डिजिटल प्रमाणपत्र द्यावे लागेल आणि दुसरा डोस दिल्यानंतर अंतिम प्रमाणपत्र दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

३० कोटी लोकांना पुढील काही महिन्यांमध्ये लस द्यायची आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीबाबत पसरलेल्या अफवा थांबवण्याची जबाबदारी ही राज्यांवर असून धार्मिक आणि अन्य संघटनांशी यासाठी चर्चा करून पावले उचलली गेली पाहिजे, असे मतही मोदींनी यावेळी व्यक्त केले. बर्ड फ्लू देशातील केरळ, राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणा, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात पसल्याची माहिती आहे. बर्ड फ्लूच्या नियंत्रणासाठी प्राणीसंग्रहालय, पोल्ट्री फार्म आणि पाण्याच्या स्त्रोतांसारख्या ठिकाणी लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.