सीरमने जाहिर केली कोरोना प्रतिबंधक लसीची अधिकृत किंमत


पुणे – लवकरच कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात होणार असून केंद्र सरकारकडून पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला लसीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. त्याचबरोबर लसीची अधिकृत किंमत देखील समोर आली आहे. २०० रुपये एवढी लसीच्या एका डोसची किंमत असणार असल्याची माहिती सीरम इन्सिट्यूटच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाशी या लसीसाठी सीरम इंस्टिट्यूटने करार केला असून कोव्हिशिल्ड लसीची निर्मिती केली आहे. १६ जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. यात सुरुवातीला देशातील अत्यावश्यक सेवेतील ३ कोटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर ५० वर्षांवरील नागरिक आणि गंभीर स्वरुपाच्या आजाराने ग्रासलेल्या नागरिकांना लस देण्यात येईल.

दरम्यान लसीच्या वाहतुकीसाठीची तयारी देखील सीरम इंस्टिट्यूटकडून पूर्ण झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात लसीची कूल-एक्स कोल्ड चैन लिमिटेट कंपनी वाहतूक करणार आहे. कोल्ड स्टोरेज वाहने देखील सीरम इंस्टिट्यूटबाहेर सज्ज ठेवण्यात आली आहेत.