अन्यथा व्हॉट्सअॅप-फेसबुकवर बंदी घाला, व्यापाऱ्यांची पत्राद्वारे सरकारकडे मागणी


नवी दिल्ली – व्हॉट्सअॅप आणि फेसबुकवर बंदी घालण्याची मागणी देशातील व्यापाऱ्यांची अग्रणी संस्था, दी कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (CAIT) केली आहे. CAIT ने केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रविशंकर प्रसाद यांना पत्र लिहून व्हॉट्सअॅपला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावे अथवा व्हॉट्सअॅपवर आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकवर बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.

व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीनंतर युजरचा सर्व वैयक्तिक डेटा, पेमेंट ट्रांजेक्शन, कॉन्टॅक्ट्स, लोकेशन्स आणि अन्य महत्त्वाची माहिती, व्हॉट्सअपच्या हाती लागेल आणि कंपनी भविष्यात त्या माहितीचा वापर कोणत्याही कारणासाठी करू शकते. व्हॉट्सअॅपचे भारतात 20 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. यातील प्रत्येकाचा पर्सनल डेटा अतिशय महत्त्वाचा असून त्या डेटाचा जर गैरवापर झाला तर फक्त देशाच्या अर्थव्यवस्थेलाच नाही तर देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या नव्या पॉलिसीला रोखावे अन्यथा दोन्ही कंपन्यांवर थेट बंदी घालावी, अशी मागणी CAIT ने पत्राद्वारे केली आहे.

व्हॉट्सअॅपने नवीन वर्षात आणलेल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नव्या प्रायव्हसी पॉलिसीला विरोध म्हणून व्हॉट्सअॅप बॉयकॉट करण्याची मोहिमही सुरू आहे. अशात आता देशातील व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत व्हॉट्सअॅपला नवीन प्रायव्हसी पॉलिसी लागू करण्यापासून रोखावे अन्यथा व्हॉट्सअॅपवर आणि व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुकवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे.