मुंबई उच्च न्यायालयाचा सोनू सूदला दिलासा


मुंबई: मुंबई महानगरपालिकेने जुहूमधील इमारतीच्या बांधकामात बदल केल्याप्रकरणी अभिनेता सोनू सूद विरोधात कारवाईचा पवित्रा घेतला होता. पण मुंबई उच्च न्यायालयाने सोनू सूदला दिलासा दिला आहे. कारवाईपासून दिवाणी न्यायालयाने दिलेले अंतरिम संरक्षण १३ जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचे आदेश न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहेत.

‘शक्तीसागर’ नावाची सहा मजली निवासी इमारत जुहूमधील एबी नायर मार्गावर आहे. सोनू सूदच्या मालकीची ही इमारत आहे. पण या इमारतीत सोनूने बदल करून तिचे हॉटेलमध्ये रूपांतर केले होते. महानगरपालिकेची आवश्यक परवानगी त्यासाठी घेतली नसल्याचे तपासणीत आढळल्यानंतर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये महानगरपालिकेने सोनूला एमआरटीपी कायद्यांतर्गत नोटीस बजावली होती. सोनूने त्याविरोधात दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून कठोर कारवाई होऊ नये म्हणून तातडीचा अर्जही केला होता. तो अर्ज फेटाळत त्याविरोधात अपील करण्यासाठी त्याला दिवाणी न्यायालयाने तीन आठवड्यांची मुदत दिली होती. त्याचा अर्ज फेटाळला जाताच महानगरपालिकेने जुहू पोलिसांत चार जानेवारीला लेखी तक्रार दिली. पण गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही.

पोलिसांत मुंबई महानगरपालिकेने तक्रार केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात सोनू सूदने तात्काळ धाव घेतली होती. महानगरपालिकेची नोटीस रद्द करावी किंवा तूर्तास त्यावरील कठोर कारवाईला मनाई करावी, अशा विनंती त्याने केली होती. आज त्यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने त्यावेळी सोनू सूदला तात्पुरता दिलासा दिला.