खासदार बाबुल सुप्रियो यांनी विहारीच्या खेळीवर केली टीका


नवी दिल्ली – भारताने बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखले. ९७ धावांवर ऋषभ पंत बाद झाल्यानंतर हनुमा विहारीने चिवट फलंदाजी केली व सामना अनिर्णीत अवस्थेकडे नेला. ऑस्ट्रेलियाला या सामन्यात विजयाची जास्त संधी होती.

पण हनुमा विहारी आणि आर. अश्विनने अखेरीस ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना यश मिळणार नाही याची काळजी घेतली. क्रिकेटच्या जाणकारांडून एकाबाजूला हनुमा विहारीच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे. पण विहारीच्या खेळीवर गायक, भाजपा नेता आणि खासदार बाबुल सुप्रियो यांनी टीका केली आहे.


हनुमा विहारी फक्त सात धावा करण्यासाठी १०९ चेंडू खेळला. हा अत्याचार असून भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच हुनमा विहारीने मारले नाही, तर त्याने क्रिकेटची हत्या सुद्धा केली. क्रिकेटमधील मला काही कळत नसल्याचे देखील बाबुल सुप्रियो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. हनुमा विहारीने पुढाकार घेऊन खराब चेंडू सीमापार धाडले असते तर भारताने कदाचित ऐतिहासिक विजयाची नोंद केली असती, असे बाबुल सुप्रियो म्हणाले. कोणी अपेक्षा केली नसेल असे काम पंतने करुन दाखवले. खेळपट्टीवर हनुमा विहारी स्थिरावला होता. त्यामुळे त्याने खराब चेंडू सीमापार धाडायला हवे, असे बाबुल सुप्रियो म्हणाले.