‘मोदींनी पक्षांना दाणे खायला घातले आणि पक्षी बर्ड फ्लूच्या कचाट्यात सापडले’


नवी दिल्ली – केंद्र सरकारने रविवारी केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत बर्ड फ्लूचा फैलाव झाल्याचे जाहीर केले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने या रोगाच्या साथीचे सावट राज्यावर आहे. रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट केले. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकीकडे बर्ड फ्लूचा फैलाव होत असतानाच आता बर्ड फ्लूच्या विषयावरुन राजकारण सुरु झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.


याचदरम्यान ट्विटरच्या माध्यमातून समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते असणाऱ्या आय. पी. सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक फोटो ट्विट करुन बर्ड फ्लूवरुन निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी मोराला दाणे खायला घालत असतानाच फोटो आय. पी. सिंह यांनी ट्विट केला आहे. सिंह यांनी या फोटोला कॅप्शन देताना या म्हणावे या माणसाला? पक्षांना दाणे खायला घातले आणि बर्ड फ्लूच्या कचाट्यात पक्षी सापडल्याचे कॅप्शन दिले आहे.