मनसे वरळीतील नागरिकांच्या खऱ्या समस्या ‘पेंग्विन गेम सीरिज’ च्या माध्यमातून दाखवणार


मुंबई – वरळी A+ उपक्रम शिवसेनेकडून राबवला जात असून त्यानुसार स्ट्रिट आर्ट, एलईडी सिग्नल्स आणि रस्त्यांचे नुतनीकरण केले जात आहे. या उलट मनसेकडून आता ‘पेग्विंग गेम सीरिज’ वरळीतील नागरिकांच्या खऱ्या समस्या दाखवून देण्यासाठी लॉन्च करण्यात आली आहे. तर फेसबुकवर याचा पहिलाच एपिसोड हा लाइव्ह करण्यात आला. त्यामध्ये अत्यंत वाईट पद्धतीने प्रेमनगर येथे करण्यात येणारा पाणीपुरवठा आणि निर्जंतुकीकरणाची समस्या दाखवण्यात आल्या. यावरुन असे दिसून येते की, वरळीतील खऱ्या समस्या स्थानिक आमदार आणि तेथील कार्यरत पक्ष विसरले असून फक्त सुशोभिकरणाच्या पाठी ते लागले आहेत. पण येथील सर्वसामान्यांना मुलभूत समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे मनसेचे संतोष धुरी यांनी म्हटले आहे.

धुरी यांनी पुढे असे ही म्हटले की, प्रत्येक पंधरा दिवसानंतर पेग्विंग गेम सीरिजचे पुढील एपिसोड दाखवले जाणार आहेत. हे एपिसोड सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. यासाठी प्रेम नगर येथील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून टॉयलेट्सची झालेली दुर्दशाबद्दल ही त्यांनी सांगितले. सार्वजनिक टॉयलेट्सला दरवाजेच नाहीत, पाण्याचा पुरवठा नाही अशी समस्या असून त्याबद्दल तक्रार करुन आता नागरिक कंटाळले असल्याचे ही धुरी यांनी सांगितले.

नुकतेच महापालिकेने वरळी सी फेसच्या परिसरात प्रथमच एलईडी ट्राफिक सिग्नल्स लावले असून ज्यामुळे ट्राफिक सिग्नलचा कलर होईल त्याच रंगाचे ते ट्राफिक पोल दिसून येणार आहेत. तसेच आदित्य ठाकरे यांनी गेल्या काही आठवड्यात वरळीत विविध उपक्रमांचे उद्घाटन ही केले होते. या सर्व सुशोभिकरणाच्या गोष्टी झाल्याच पण स्थानिकांच्या खऱ्या समस्या या अधिकच वाईट होत चालल्या असल्यामुळेच आमच्या सीरिजच्या माध्यमातून आता या सर्व गोष्टी उघडकीस आणणार असल्याचे धुरी यांनी म्हटले आहे.