मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात निवडणूक आयोगाकडे किरीट सोमय्यांची तक्रार


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपाचे रान उठवले असल्यामुळे आता भाजपा नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना यांच्यातील वाद वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आपल्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरे यांनी आपली संपत्ती लपवल्याचा आरोप करत त्यांनी ही तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: किरीट सोमय्या यांनी दिली आहे.

आपल्या पत्नीच्या नावे अलिबागमध्ये असलेली ५ कोटी रूपयांची संपत्ती माहित असूनही ती निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवली नाही. या प्रकरणाचा मी स्वत: जाऊन तपास केला. भाजपने महाराष्ट्रातील निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी बलदेवसिंग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. आपली ही संपत्ती उद्धव ठाकरे यांनी जाणूनबुजून लपवली आहे आणि त्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी आम्ही केल्याचे सोमय्या म्हणाले. तसेच बलदेवसिंग यांनी आम्हाला आमची तक्रार दिल्लीत निवडणूक आयोगाला पाठवणार असल्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी नमूद केले.