गौप्यस्फोट; फडणवीस नितेश राणेंना टाकणार होते तुरूंगात, पण नारायण राणे भाजपला शरण गेले


कणकवली – एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा भाजप आमदार नितेश राणे यांनी घातला होता, या गुन्ह्यात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना तुरुंगात टाकणार होते, पण भाजपला नारायण राणे शरण गेल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस या गुन्ह्यात नितेश राणेंना तुरुंगातही टाकणार असल्याचा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

शिवसेना आणि राणे कुटुंबातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. सातत्याने दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना बघायला मिळतात. त्यातच शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी आता नितेश राणे यांच्याबद्दल खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. विनायक राऊत कणकवलीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले, नवी मुंबईतील एका व्यक्तीला १२ कोटींचा गंडा नितेश राणेंनी घातला होता. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. फडणवीस हे नितेश राणेंना या प्रकरणी तुरुंगात टाकणार होते. पण भाजपला नारायण राणे शरण गेल्या ते प्रकरणी थांबले. जर आम्ही आता मनात आणले, तर ते प्रकरण एका दिवसात उघड करु शकतो आणि ते प्रकरण उघड झाले, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.

फडणवीस यांनी अखेरपर्यंत नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजला परवानगी दिली नाही म्हणून दोन महिन्यांपूर्वी राणे मातोश्रीवर दिवसातून तीन तीन वेळा फोन करत होते. उद्धव ठाकरेंनी कोकणात मेडिकल कॉलेज होत असल्यामुळे अखेर परवानगी दिल्याचा दावा राऊत यांनी केला. उद्धव ठाकरेंना काही कळत नाही असा आरोप करता. नको कळू दे, पण टीका करताना शान राखून टीका करा, असा राजकीय सल्ला राऊत यांनी नारायण राणे यांना दिला आहे.