आजपासून सुरु होऊ शकते सीरमच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे वितरण


पुणे: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका वाढण्याची शक्यता असतानाच केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपातकालीन वापराला परवानगी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच आजपासून पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती सुरु असलेल्या कोविड प्रतिबंधक लसीचे वितरण सुरु होण्याची शक्यता आहे. ही लस घेऊन जाणारे कंटेनर आज संध्याकाळीत किंवा उद्या सकाळी बाहेर पडणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे कंटेनर पुण्यातील लोहगाव विमानतळावर पोहोचतील. त्यानंतर पुढील वाहतूक विमानातून होईल. ही लस देशातील विविध शहरात विमानातून पोहोचवण्यात येईल. त्यासंदर्भातील हालचाली सीरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरु झाल्या असल्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

देशात 16 जानेवारी म्हणजे येत्या शनिवारपासून लसीकरणाला सुरुवात होणार असल्यामुळे लसींचे वितरण आज रात्री किंवा उद्या सकाळपासून सुरु होण्याची दाट शक्यता आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या लसीच्या आपातकालीन वापराला केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. पुण्यातून सीरमच्या लसीचे उत्पादन होत असल्यामुळे तिथूनच देशभरात लसीचा पुरवठा केला जाणार आहे. त्याबाबत सुरक्षेच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश पुणे पोलिसांना देण्यात आले आहेत. लस वितरणात त्रृटी आढळू नयेत यासाठी अधिकारीवर्ग लक्ष ठेवून आहे. पोलिस आयुक्तांसह अतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

सर्वप्रथम देशातच ‘कोव्हिशिल्ड’चे 4-5 कोटी डोस दिले जाणार आहेत, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून नुकतीच देण्यात आली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर आदर पुनावाला म्हणाले की, कोरोना व्हॅक्सिन ‘कोव्हिशिल्ड’चे 4-5 कोटी डोस सर्वात आधी भारताला दिले जातील. लसींची कमतरता 2021 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये दिसून येईल. परंतु ऑगस्ट-सप्टेंबर 2021 पर्यंत लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या लसींचा पुरवठा करण्यात सक्षम होतील. दरम्यान, किती प्रमाणात लसी हव्या आहेत आणि त्या किती वेळात हव्या आहेत, हे सरकार ठरवणार आहे. जुलै 2021 पर्यंत लसींचे 30 कोटी डोस तयार करण्याचे आपले लक्ष्य असल्याचेही पुनावाला यांनी सांगितले आहे.