पंचाला शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला आयसीसीने ठोठावला दंड


सिडनी – ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन याला सिडनी येथे तिसऱ्या कसोटी सामन्यात पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी आयसीसीने दंड ठोठावला आहे. पंचाशी हुज्जत घातल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर तिसऱ्या दिवशी पेनवर कारवाई करण्यात आली आहे. पेनला सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कपात करण्याचा दंड करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) नियम २.८ नुसार आचार संहिता भंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन हा दोषी आढळल्यामुळे सामन्याच्या मानधनातून १५ टक्के रक्कम कपात करण्याचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. आयसीसीने यासंदर्भात जारी केलेल्या वक्तव्यात म्हटले की, टीम पेनने नियमाचा भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर एक ‘डिमेरिट’अंक त्याच्या अनुशासनात्मक रिकॉर्डमध्ये जोडण्यात आला आहे. पेन याची मागील २४ महिन्यात ही पहिलीच चूक आहे.’

तिसऱ्या दिवसाच्या खेळात पुजाराच्या पॅडला लागून चेंडू उडाला आणि तो झेल घेण्यात आला. पंचांनी पुजाराला नाबाद ठरवल्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन याने लगेचच DRSची मदत घेतली. रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागला की नाही याबद्दल नीट कळू शकले नाही. चेंडू बॅटच्या आतल्या बाजूला लागल्याची शक्यता असल्याने ऑफ साईडच्या कॅमेरात काहीही कळले नाही. ऑस्ट्रेलियन कर्णधार पेन घडलेला प्रकार पाहून प्रचंड भडकला. पेन मैदानावरील पंच विल्सन यांच्याशी वाद घालू लागला. त्यावेळी पंचांनी त्याला सांगितले की तिसऱ्या पंचांचा निर्णयच अंतिम असेल. त्यावर उत्तर देताना पेनने पंचांना शिवीगाळ केली. “F**king consistency, Blocker, there’s a thing (spike) that goes past it”, असे वाक्य उच्चारत त्याने आपली नाराजी व्यक्त केली.