प्रिन्स हॅरी, मेगन मर्केलचा सोशल मिडीयाला रामराम

ब्रिटनचा राजकुमार ड्युक ऑफ ससेक्स हॅरी आणि त्याची पत्नी डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल यांनी सोशल मिडीयाला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. द संडे टाईम्सच्या बातमीनुसार गतवर्षी हे जोडपे त्यांच्या  एक वर्षाच्या मुलासह राजपरिवार सोडून स्वतंत्रपणे राहण्यासाठी बाहेर पडले होते. शाही सदस्य या नात्याने या दोघांचे इन्स्टाग्रामवर १ कोटी फॉलोअर आहेत. त्यांनी अमेरिकेत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे.

सोशल मीडियावर मेगन आणि हॅरी यांच्यावर टीका झाली होती. मेगनला ऑनलाईन ट्रोलिंगला अनेकदा सामोरे जावे लागले त्यामुळे या दोघांनी सोशल मीडियापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असे सांगितले जात आहे. त्यांच्या आर्चवेल फौंडेशनसाठी सुद्धा ते सोशल मीडियाचा वापर करणार नसल्याचे समजते. २०१८ मध्ये हॅरी आणि मेगन यांचा विवाह झाला असून तेव्हापासून त्यांची सोशल मीडियावर चांगली उपस्थिती आहे. लग्नापूर्वी मेगनचे इन्स्टाग्रामवर १९ लाख, ट्विटरवर साडेतीन लाख तर फेसबुक पेजवर मेगनला ८ लाख लाईक आहेत. लग्नानंतर त्यांनी संयुक्त इन्स्टाग्राम खाते सुरु केले होते पण शाही दर्जा सोडल्यावर ते बंद केले गेले.

आता हे दोघे त्यांच्या कामाची माहिती ऑनलाईन व्हिडीओ व टीव्ही च्या माध्यमातून देणार आहेत. त्यासाठी काही निवडक प्रकाशक आणि आर्कवेल वेबसाईटच्या माध्यमाचा आधार घेतला जाणार आहे असे समजते.