पाक क्रिकेटर शोएब मलिकच्या कारला अपघात

पाकिस्तानी क्रिकेटर आणि भारताची स्टार टेनिस खेळाडू सानिया मिर्झा हिचा पती शोएब मलिक याच्या स्पोर्ट्स कारला भयानक अपघात झाला असून त्यात कारची पूर्ण मोडतोड झाली आहे. सुदैवाने शोएब याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते. मात्र या अपघाताबाबत सानिया अथवा शोएब यांनी कोणताही खुलासा केलेला नाही. पाकसाठी २१ वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या शोएबने ३५ टेस्ट मध्ये १८९८ धावा केल्या आहेत. तो अष्टपैलू खेळाडू असून त्याने पाकिस्तानचे नेतृत्वही केले आहे.

प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या  माहितीनुसार शोएब पाकिस्तान सुपर लीगच्या प्लेअर ड्राफ कार्यक्रमानंतर कार मधून बाहेर पडला पण त्याच वेळी त्याच्या कारचा वेग प्रचंड होता. कार नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटरवरून वेगाने जात असताना शोएबचे कारवरील नियंत्रण सुटले आणि त्याची कार ट्रकवर जोरात आदळली. सोशल मीडियावर या अपघाताचे फोटो वेगाने व्हायरल झाले आहेत.

पाकिस्तानी समा न्यूज चॅनलच्या बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार शोएब कार्यक्रमासाठी गेला तेव्हा त्याच्या कारचे मोहम्मद आमीर आणि बाबर आझम यांनी कौतुक केले. त्यानंतर घरी जाण्यासाठी शोएब आणि वहाब रियाज आपापल्या कार मधून निघाले आणि रस्त्यात अचानक त्या दोघात रेस सुरु झाली. त्यावेळी शोएबचा कारवरील कंट्रोल सुटला आणि तीन चार कारना धक्का देऊन शोएबची कार रेस्टॉरंट बाहेर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. त्यावेळीच वहाबने त्याला कार मधून बाहेर काढले. शोएबला फारशी दुखापत झाली नव्हती मात्र त्याला जोरदार धक्का बसला होता.