ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद करणारी भारतवंशी विजया गाडे

जगाची महासत्ता अमेरिकेच्या पॉवरफुल अध्यक्षांचे म्हणजे डोनल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमस्वरूपी बंद करण्यामागे भारतवंशी युवती विजया गाडे हिचा निर्णय असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेत भारतवंशीयांचा प्रशासन व मातब्बर कंपन्यांची प्रमुखपदे सांभाळण्यात मोठा सहयोग आहे आणि अनेक महत्वाचे निर्णय ही मंडळी घेत असतात हे आता उघड गुपित आहे. मात्र प्रसिद्धीपासून दूर राहून पडद्यामागे काम करणारी विजया हिचा निर्णय त्यामुळे विशेष चर्चेचा ठरला आहे.

विजया मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरच्या कायदा आणि नीती टीमची प्रमुख आहे. हीच टीम ट्विटरसाठी कायदे निश्चित करते. याच टीमने अमेरिकेच्या संसदेवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचे खाते निलंबित करायचा निर्णय घेतला होता. मात्र ४५ वर्षीय विजयाने ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. यामुळे विजया ट्रम्प समर्थकांच्या निशाण्यावर आली आहे.

विजयाचा जन्म भारतात झाला आहे. तिचे वडील मेक्सिको येथे इंजिनीअर म्हणून काम करत होते त्यामुळे तिचे शिक्षण टेक्सास येथे झाले. तिने न्युयॉर्क लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतली आहे. २०११ पासून ती या सोशल मिडिया साईटवर काम करते आहे.