ही लक्षणे शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी आहार मिळत असल्याची


बहुतेक वेळी आहार जास्त असला, की वजन वाढणे, अॅसिडीटी, अपचन अश्या प्रकारच्या तक्रारी उद्भविताना आपण पाहतो. अनेकदा सणा-समारंभाच्या निमित्ताने, मेजवानी प्रसंगी किंवा बाहेर जेवायला गेले असताना हमखास जितकी भूक आहे, त्यापेक्षा जास्त खाल्ले जाते. याचा त्रास मागून जाणवू लागतो. अपचन, पोट जड होणे, सुस्ती येणे, गॅसेस, अश्या तक्रारी उद्भवू लागतात. अनेक व्यक्तींना पोटभर जेवल्यानंतरही वारंवार काही ना काही खाण्याची इच्छा होत असते. तसेच मधल्या वेळेच्या भुकेला नेहमी पौष्टिक पदार्थच खाल्ले जातात असे ही नाही. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते.

प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात या न्यायाने जसा जास्त आहार शरीराला अपायकारक ठरू शकतो, त्याचप्रमाणे अतिशय कमी आहारही शरीराच्या दृष्टीने घातक ठरू शकतो. आहार जास्त असेल, तर ज्याप्रमाणे अपचन, गॅसेस इत्यादी लक्षणे दिसून येतात, त्याचप्रमाणे आहार कमी असेल तर शरीराला आवश्यक ते पोषण न मिळाल्यानेही काही ठराविक लक्षणे दिसून येतात. अन्न कमी घेतल्यामुळे त्याद्वारे शरीराला मिळणारी जीवनसत्वे, प्रथिने, क्षार, लोह, आणि इतर पोषक तत्वे शरीराला पुरेशा मात्रेमध्ये न मिळाल्याने अनेक दुष्परिणाम दिसून येऊ लागतात.

जर शरीराला पुरेसे पोषण मिळत नसेल, तर त्याचे दुष्परिणाम त्वचा आणि केस यांवर दिसून येतात. त्वचा कोरडी, रुक्ष होऊ लागते. केस गळू लागतात. त्वचेवर अकाली सुरकुत्या पडणे सुरु होऊन त्वचा आणि केस अतिशय निस्तेज दिसू लागतात. शरीरामध्ये प्रथिने आणि जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे केसगळती होते, आणि त्वचा कोरडी पडू लागते.

आपण खातो त्या अन्नातून, आपल्या आहारातून, आपल्या शरीराला उर्जा मिळत असते. या ऊर्जेमुळे शरीराचे तापमान नियंत्रित राहण्यासमदत होते, तसेच क्रियाशील राहण्यास ताकदही याच अन्नातून आपल्याला मिळत असते. जर आहार पुरेसा, आणि पौष्टिक नसेल, तर शरीर सतत थकलेले राहते. त्याचबरोबर स्नायू आणि हाडेही कमकुवत होऊ लागतात. ज्यांचा आहार अगदीच कमी आहे, त्यांना अकारण थंडी वाजत राहते, कारण शरीरामध्ये पुरेसे अन्न जात नसल्यामुळे शरीरामध्ये पुरेशी ऊर्जा निर्माण होऊ शकत नाही.

शरीराला आवश्यक तो आहार आणि पोषण मिळत नसल्याने शारीराध्ये अशक्तपणा येऊ शकतो. त्याचबरोबर सतत डोके दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे, शरीराची चयापचय शक्ती कमी होणे, यांसारखी लक्षणे दिसून येतात. सतत थकवा जाणवू लागतो. त्यामुळे सतत चिडचिड, लहान मोठ्या गोष्टींवरून सतत त्रासणे, अश्या समस्या सुरु होतात. कुठल्याही कामामध्ये लक्ष एकाग्र करणेही दुरापास्त होऊन बसते. वजन कमी करण्यासाठी ज्या व्यक्ती स्वतःच्या मनाने आपला आहार एकदम कमी करून घेतात, त्यांच्या बाबतीत या समस्या उद्भविताना दिसून येतात. आपला आहार संतुलित असणे गरजेचे आहे, कारण आपला आहार आपल्या शरीराचे इंधन आहे. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी जरी आहार कमी करायचा झाला, तर त्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण काही अन्नपदार्थ बंद केल्यानंतर शरीराला आवश्यक ती उर्जा इतर कोणत्या अन्नपदार्थांच्या द्वारे मिळू शकते आणि पोषणाच्या गरजा पूर्ण होऊ शकतात याचे योग्य मार्गदर्शन तज्ञ करू शकतात. त्यामुळे आहारतज्ञांचा सल्ला घेणे अगत्याचे ठरते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment