आपण किती साधे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न साधी राहणी उच्च विचारसरणी अशी जडजड वाक्य फेकून जगभरातील नेतेमंडळी करत असतात. रांगेत एखाद्या नेत्याला उभे राहावे लागले किंवा स्वतः गाडी एखाद्या नेत्याने चालवली तर ते भारतीयांना आश्चर्य वाटते. पण आम्ही आज तुम्हाला एका अशा राष्ट्राध्यक्षबाबत सांगणार आहोत जे खरोखर अत्यंत साधे जीवन जगायचे त्यांच्या देशाचा कारभारही चांगल्या पद्धतीने चालवत होते. राष्ट्राध्यक्ष २०१५ साली पद सोडल्यानंतरही त्यांच्या साधेपणात काही कमी झालेले नाही. तुम्ही त्यांच्या वागण्यात कोठेही सर्वांनी माझ्याप्रमाणे साधेपणानेच वागले पाहिजे असा आग्रह नसून मी निवडलेला हा पर्याय असल्याचा भाव असतो.
ते आहेत उरुग्वेचे माजी राष्ट्राध्यक्ष जोस म्युजिका. वर्षाला केवळ १२ हजार डॉलर एवढे वेतन जोस घ्यायचे आणि त्यातील ९०% रक्कम दान देऊन टाकायचे. ते ४० वे उरुग्वेचे अध्यक्ष होते. कधीही राष्ट्रपती भवनामध्ये जोस हे राहिले नाहीत. ते पत्नीबरोबर एका अत्यंत साध्या फार्महाऊससारख्या घरात राहायचे. कोणत्याही प्रकारचा मोटारींचा ताफा ते वापरत नसत. ते एका पिटुकल्या गाडीमधूनच प्रवास करुन आपली कामे व जबाबदाऱ्या पार पाडत. १९८७ साली ही गाडी तयार केलेली असून जोस स्वतःच ती चालवतात.
केवळ २ लाख १५ हजार डॉलर एवढी जोस दाम्पत्याची एकत्रित संपत्ती आहे. जोस यांच्या मते ते गरिब नाहीत. महागडी जीवनशैली मिळवण्यासाठी जे लोक पैसे मिळवण्याच्या स्पर्धेत स्वतःला अडकवतात ते गरिब असल्याचे त्यांचे मत आहे. अनेक प्रकारची कामे एकाचवेळी पैसे मिळवण्यासाठी करत राहिल्यामुळे स्वतःसाठी फारच कमी वेळ मिळतो. मी पत्करलेला मार्ग यातून स्वातंत्र्य मिळवून देणारा असल्याचेही जोस म्हणतात.